मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra Political Crisis Latest Updates Uddhav Thackeray And Eknath Shinde See The Political Journey Of Minister Eknath Shinde

Eknath Shinde: ११ कोटींची संपत्ती, १८ गुन्हे… जाणून घ्या कोण आहेत एकनाथ शिंदे?

political journey of shivsena minister eknath shinde
political journey of shivsena minister eknath shinde (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Jun 23, 2022 04:49 PM IST

Who is Eknath Shinde: शिवसेनेतून जवळपास ३५ आमदारांना वेगळं करून आपला वेगळा गट तयार करत बंडाचा झेंडा फडकवणारे कट्टर शिवसैनिक मंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास फार संकटाचा आणि संघर्षाचा राहिलेला आहे.

Political Journey of Eknath Shinde : महाराष्ट्र विधानपरिदेचा निकाल हाती आल्यानंतर काही तासांतच महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बहुतांश आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या आल्यानं सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर त्यांची शीर्ष नेतृत्वावर नाराजी असल्यानं त्यांनी बंडाचा झेंडा फडकावल्याचं माध्यमांनी स्पष्ट केलं. पहिल्यांदा त्यांनी सोबतच्या सर्व आमदारांना भाजपशासित गुजरातमधील सूरतमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं आणि त्यानंतर त्यांच्यासह सर्व आमदारांना आसामच्या गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेच्या या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. 'आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिदुत्त्व मानतो, त्यामुळं आम्ही सत्तेशी आणि विचारांशी तडजोड करणार नाही, त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपशी युती करावी', अशी कठोर भूमिका शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी घेतल्यानं मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची मोठी अडचण झाली आहे.

कोण आहेत एकनाथ शिंदे?

मूळ सातारा जिल्ह्यातील असलेल्या शिंदे यांचं कुटुंब १९७० च्या दशकात कुटुंबासह ठाण्यात स्थायिक झालं होतं. तेव्हा एकनाथ शिंदे यांचं वय केवळ १० वर्ष इतकं होतं. १९८० च्या दशकात शिवसेनेत काम करण्याआधी शिंदे हे ठाण्यात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे, याशिवाय त्यांनी एका दारूच्या कारखान्यातही काम केलेलं आहे. १९८० च्या दशकात 'ठाण्याचे बाळ ठाकरे' म्हणून ओळखले जाणारे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात शिंदे आले. त्या काळात त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनांत भाग घेतला आणि शिवसेना नेते दिघेंचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली.

शिवसेनेत कसं मिळवलं महत्त्वाचं स्थान?

आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदेंची राजकीय सक्रियता आणि आंदोलनांतील सहभाग लक्षात घेता त्यांना ठाणे महापालिकेचा गटनेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात कधीही मागे वळून पाहिलं नाही. २००४ साली ते ठाण्यातील पाचपाखडी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून आतापर्यंत या मतदारसंघात त्यांना कुणीही हरवू शकलेलं नाही.

आनंद दिघे यांचे शिष्य आणि राजकीय वासरदार...

शिवसेनेवर शिंदेंचं असलेलं प्रेम, कटवट हिंदुत्त्वाचा बाणा आणि लोकांचा जनसंपर्क पाहता आनंद दिघे यांच्या अकाली निधनानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्याची सूत्र शिंदेंकडे सोपवली. त्यानंतर शिंदेंचं शिवसेनेतलं राजकीय वजन वाढलं.

२०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत?

शिंदे हे सुरुवातीच्या काळात फक्त मुंबईपुरतेच मर्यादित असल्याचं सांगितलं जायचं. परंतु जेव्हा २०१४ मध्ये सुरुवातीची काही महिने भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली तेव्हा शिवसेनेनं शिंदेंना विधानसभेतील गटनेतेपदी निवड केली. त्यामुळं शिंदे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर फडणवीस सरकारमध्ये शिंदेंना नगरविकासमंत्री करण्यात आलं.

परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली, त्यांच्या युतीला स्पष्ट बहुमतही मिळालं. पण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'अडीच अडीच वर्ष' मुख्यमंत्रीपदाचं वचन पाळलं नाही म्हणून भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं असल्यानं साहजिकच शिवसेनेत ठाकरेंनंतर शिंदेंना शह कोणताही नेता नसल्यानं हे पद शिंदेंकडे जाणार हे जवळपास स्पष्ट होतं. परंतु ऐनवेळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनं सरकार स्थिरपणे चालवायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्विकारावं अशी विनंती केली. आणि ठाकरेंनी ही विनंती खुल्यामनानं मान्य केली. त्यामुळं शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. तिथूनच ते नाराज असल्याचं बोललं जातं.

शिंदेना शिवसेनेत विरोध होता?

शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्यात 'मातोश्री' चा हस्तक्षेप वाढला होता, अशी दबक्या आवाजात नेहमीच चर्चा व्हायची, परंतु शिंदेंनी हे कधीही बोलून दाखवलं नाही. याशिवाय मुख्यमंत्री ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंना पर्यावरणमंत्री केल्यानं शिवसेनेतील महत्त्वाचे निर्णय ते घेत असून शिंदेंना साईडलाईन केलं जात असल्याच्याही चर्चा झाल्या. आता शिंदेंनी थेट ठाकरेंविरोधात बंड केल्यानं या सर्व चर्चा खऱ्या होत्या, असंही अनेकजण सांगतात.

इतकी आहे शिंदेंची संपत्ती...

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे २ कोटींची चल आणि ९ कोटींची अचल संपत्ती असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय याच प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्यावर १८ प्रकरणात गुन्हे दाखल असल्याचंही नमूद केलं होतं.

एकनाथ शिंदेंचं शिक्षण काय?

मंत्री शिंदे यांचं शिक्षण अकरावीपर्यंत झालेलं आहे. परंतु त्यांनी त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर बनवलं आहे. याशिवाय आता श्रीकांत शिंदे हे गेली दोन टर्म कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.

संबंधित बातम्या