मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Political Crisis Live: ‘कुत्रा सोडला तर कुणीही बेईमानी करू शकतो'

Sanjay Raut

Maharashtra Political Crisis Live: ‘कुत्रा सोडला तर कुणीही बेईमानी करू शकतो'

  • Shiv Sena Revolt Live update: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीत आता विधानसभा उपाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Sat, 25 Jun 202213:22 IST

Sanjay Raut: मी कधीही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला नसतो - संजय राऊत

बंडखोर आमदारांना त्यांच्या कृत्याचं समर्थन करायचं असल्यानं ते आता बडव्यांची नावं पुढं करतायत. मुख्यमंत्र्यांच्या अवतीभवती असणारे लोक आम्हाला पोहोचू देत नाहीत. मी स्वत: कधीच मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला नसतो. इतक्या वर्षात मी फक्त तीनदा मंत्रालयात गेलोय. 'वर्षा'वर मी क्वचितच गेलोय. मी पक्षाच्या आणि 'सामना'च्या कामात असतो - संजय राऊत

Sat, 25 Jun 202213:15 IST

Sanjay Raut Interview: मुख्यमंत्री करतो असं सांगितलं तर एकनाथ शिंदे टणाटण उड्या मारत येतील - संजय राऊत

मुख्यमंत्री करतो असं सांगितलं तर एकनाथ शिंदे टणाटण उड्या मारत येतील. मी त्यांना चांगलं ओळखतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sat, 25 Jun 202213:09 IST

Sanjay Raut: कुत्रा सोडला तर कुणीही बेईमान होऊ शकतो - संजय राऊत

बंडखोर आमदारांची प्रत्येक नस आम्हाला माहीत आहे. यातले अनेक जण आमच्या हाताखालून गेले आहेत. पण यांना ओळखण्यात चूक झाली असं म्हणता येत नाही. बेईमान कुणीही होऊ शकतो. कुत्रा सोडला तर कुणीही बेईमान होऊ शकतो - संजय राऊत

Sat, 25 Jun 202213:02 IST

Sanjay Raut: एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे यांच्या जाण्याचं जास्त दु:ख

एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे यांच्या जाण्याचं दु:ख जास्त आहे. बाकी दीपक केसरकर, अनिल बाबर, प्रकाश सुर्वे यांचा शिवसेनेशी तसा संबंध नाही. सदा सरवणकर जाऊन येऊन असतात. ते गेल्याचं फार दु:ख नाही - संजय राऊत  

Sat, 25 Jun 202213:02 IST

Sanjay Raut: संजय शिरसाट यांच्यावर संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री भेट देत नाहीत. आमदारांची कामं होत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस कामं करू देत नाही, अशी तक्रार पत्र लिहून बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केली होती. त्यांच्यावर राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. संजय शिरसाटला लिहिता येतं का? तेच पत्र समोर बसून त्याला पुन्हा लिहायला सांगा - संजय राऊत

Sat, 25 Jun 202212:58 IST

Sanjay Raut: आमदारांना निधी वाटप करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्याकडंच होतं - संजय राऊत

आमदारांना निधी वाटप करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्याकडं होतं. त्यांना मंत्री कशासाठी केलं होतं? आमदारांची कामं करण्यासाठीच त्यांना मंत्री केलं होतं. बरं ते आमदारांना निधी स्वत:च्या खिशातून देत नव्हते. सरकारचा पैसा होता - संजय राऊत

Sat, 25 Jun 202212:54 IST

Sanjay Raut: बंडखोरांपैकी अर्ध्या लोकांचा हिंदुत्वाशी संबंध नाही - संजय राऊत

एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या अर्ध्या लोकांचा हिंदुत्वाशी संबंध नाही. काहीतरी बहाणे सांगतायत. सरळ सांगा की सरकार पाडायचं आहे. त्यांच्याकडचा आकडा आम्हाला सांगू नका. आकडा एकच आहे ५० कोटींचा. जे प्रत्येकाला मिळाले आहेत. ईडीनं चौकशी केली तर सगळं समोर येईल - संजय राऊत

Sat, 25 Jun 202212:55 IST

Eknath Shinde: शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नुकतेच सहा ठराव करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कोणालाही वापरता येणार नाही, असा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला. त्यानंतर आता गुवाहाटी येथील हॉटेलात एकनाथ शिंदे यांच्या गटाची बैठक सुरू झाली आहे. त्यात काय निर्णय होतो याबद्दल उत्सुकता आहे.

Sat, 25 Jun 202212:55 IST

Shivsena Revolt: शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर संजय राऊत यांचा पत्रकारांशी संवाद

कार्यकारिणीत सहा महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्यात आला. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा गौरव करण्याबाबतचा ठराव झाला. 

  • उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वासाचा ठराव
  • उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याच्या गौरवाचा ठराव.
  • शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे व राहील.
  • शिवसेना हिंदुत्वाचा विचारच पुढं घेऊन जाईल. शिवसेना अखंड महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा विचार पोहोचवत राहील. मराठी अस्मितेशी कधीही प्रतारणा करणार नाही. 
  • ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, त्यांच्यावर कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना देण्याचा ठराव मंजूर झाला. 
  • बाळासाहेब ठाकरे यांचं नाव इतर कोणत्याही राजकीय संघटनेला वापरता येणार नाही. कोणताही बेईमान व गद्दार या नावानं स्वत:चा स्वार्थ साधू शकणार नाही.

Sat, 25 Jun 202212:55 IST

Shivsena National Executive Meet: शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपली! अनेक ठराव मंजूर

शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाळीनंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. या कार्यकारिणीत अनेक ठराव मंजूर करण्यात आले. गद्दारांना पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

Sat, 25 Jun 20229:59 IST

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोरांना कारवाईची नोटीस

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोरांना नोटीस पाठवली असून २७ जून, संध्याकाळी  साडेपाच वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. तुमची आमदारकी का रद्द करू नये, अशी 

Sat, 25 Jun 20229:27 IST

सरकारचं काम सुरळीत सुरू आहे. जनतेची कुठलीही अडचण होणार नाही - बाळासाहेब थोरात

शिवसेनेतील बंडामुळं सरकारवर कुठलाही परिणाम झालेला नाही. इतर सर्व मंत्री नेहमीप्रमाणं मंत्रालयात जात आहेत. आपली कामं करत आहेत. जनतेला कुठलीही अडचण होणार नाही. बंडखोर मंत्र्यांवरील कारवाईचा निर्णय मुख्यमंत्री घेतील - बाळासाहेब थोरात

Sat, 25 Jun 20229:06 IST

Tanaji Sawant: कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी इशारा

कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी इशारा दिला आहे. आमचे गटनेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसं उत्तर दिलं जाईल. माझी नम्र विनंती आहे की प्रत्येकानं आपल्या औकातीत राहावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

Sat, 25 Jun 20229:05 IST

Aaditya Thackeray: शिवसेनेची बांधबंदिस्ती; आदित्य ठाकरे घेणार शिवसैनिकांचे मेळावे

एकनाथ शिंदे यांच्या बंडाची झळ संघटनेला बसू नये म्हणून शिवसेनेनं बांधबंदिस्ती सुरू केली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज सायंकाळी पाच वाजता शिवसैनिकांच्या मेळाव्यास संबोधित करणार आहेत. त्यानंतर उद्या, रविवारी सांताक्रूझ इथं मेळावा होणार आहे. तिथंही ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

Sat, 25 Jun 20228:44 IST

Section 144 in Mumbai: मुंबई शहरात कलम १४४ लागू

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात काही ठिकाणी आक्रमक शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Sat, 25 Jun 20228:44 IST

Uddhav Thackeray in Shivsena Bhavan: उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल, कार्यकारिणीची बैठक

शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.

Sat, 25 Jun 20226:53 IST

Dilip Walse Patil: आमदारांचे संरक्षण काढलेले नाही, आरोप चुकीचे - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यातील कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचा आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागानं दिलेला नाही. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Sat, 25 Jun 20224:55 IST

Shiv Sena Revolt: बंडखोर आमदारांची हॉटेलची आणि विमानांची बिलं कोण भरतंय? - राष्ट्रवादीचा सवाल

बंडखोर आमदारांची सुरत, गुवाहाटी येथील हॉटेलची बिलं कोण भरत आहे?, स्पाईस जेट विमानाचं बिल कोणी भरलं? आमदार घोडेबाजाराची किंमत ५० कोटी हे खरे आहे का? हे पैसे कोणी दिले?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. आयकर विभाग किंवा ईडीनं छापे टाकल्यास काळा पैशाचा स्तोत्र उघडकीस येईल, असं तपासे यांनी म्हटलं आहे.

Sat, 25 Jun 20224:55 IST

Devendra Fadnavis: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा दिल्ली वारी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रात्री दिल्लीला गेले होते. पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत चर्चा झाल्यानंतर पहाटे ते पुन्हा मुंबईत परतल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्याची चर्चा होत आहे.

Sat, 25 Jun 20224:55 IST

Shiv Sena Revolt Live: १६ आमदारांना ४८ तासांचा अल्टिमेटम, अन्यथा अपात्र ठरवणार

शिवसेनेनं बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांना याबाबत शिवसेनेनं पत्र पाठवलं होतं. यानंतर आता १६ आमदारांना ४८ तासांच्या आत बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा त्यांना अपात्र ठरवण्यात येईल असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.