मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena Vs Eknath Shinde: शिवसेनेला धक्के पे धक्का! आणखी पाच आमदार फुटले!

Shivsena Vs Eknath Shinde: शिवसेनेला धक्के पे धक्का! आणखी पाच आमदार फुटले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 23, 2022 08:02 PM IST

Eknath Shinde vs Shivsena: शिवसेनेतील बंडखोर आमदारांची यादी दिवसागणिक वाढतच असून आज आणखी पाच आमदारांनी उद्धव ठाकरे यांनी साथ सोडली आहे.

Deepak Kesarkar - Sada Sarvankar
Deepak Kesarkar - Sada Sarvankar

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन केल्यानंतरही शिवसेनेतील बंडाळी शमत नसल्याचं दिसत आहे. बंडखोरांची संख्या वाढतच असून आज उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे काही आमदार ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्यांमध्ये मुंबईतील आमदारांचा समावेश नव्हता. मात्र, आता मुंबईतील आमदारही शिंदे गटाकडं जाऊ लागले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर विभागाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar), संजय राठोड (Sanjay Rathod), कुर्ला येथील मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सिंधुदुर्गातील आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) हे आमदारही गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाल्याचं समजतं.

बंडखोर गटातील आमदारांना आवाहन करताना उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला सोडला. उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनामुळं बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल होईल. काही आमदार परततील असं बोललं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलट दिसत आहे. आणखी काही आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. हे सगळे आमदार लवकरच गुवाहाटीत दाखल होतील, असं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातले समजले जाणारे माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे देखील गुवाहाटीत पोहोचले आहेत. शिंदे यांच्या बंडानंतरही राठोड हे मुंबईतच होते. शिंदे यांच्या वतीनं शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांना मागे ठेवण्यात आलं होतं. आता वाटाघाटीचे सर्व मार्ग खुंटल्यानंतर राठोड हे गुवाहाटीत पोहोचले आहेत. एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाता राठोड यांचा मंत्रिपद गेलं होतं. या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर ते मंत्रिपदासाठी प्रयत्नशील होते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या