मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra Political Crisis: Ajit Pawars First Reaction On Shiv Sena Revolt, Backs Cm Uddhav Thackeray

Ajit Pawar: एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरे? अजित पवार म्हणाले…

Uddhav Thackeray - Ajit Pawar
Uddhav Thackeray - Ajit Pawar
Ganesh Pandurang Kadam • HT Marathi
Jun 23, 2022 07:45 PM IST

Ajit Pawar backs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे उद्धव ठाकरे असू शकतात अशी चर्चा आहे. यावर अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar on Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्य सरकार संकटात आलेलं असतानाही गेले दोन दिवस कोणतीही प्रतिक्रिया न देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वच प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर, एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी उद्धव ठाकरे यांचा संबंध असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली. 

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार आणि फ्रंटल पदाधिकारी यांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पार पडली. त्यानंतर अजितदादा पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेतील बंडामुळं सरकार संकटात आलं असताना यामागे उद्धव ठाकरे असावेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनीच हा प्लान आखला असावा, अशीही एक चर्चा आहे. याबाबत विचारलं असता, ही चर्चा चुकीची असल्याचं अजित पवार म्हणाले. ‘मी गेल्या अडीच वर्षांपासून  उद्धव ठाकरे यांच्या सोबत काम करतोय. पाठीमागून काही करण्याची त्यांची पद्धत नाही. काही करायचं असेल तर ते स्वत: समोरून सांगतील,’ असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा

महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण लक्ष ठेवून आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा देऊन आघाडी सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करेल. उद्धव ठाकरे यांच्याशी काल आणि आज माझं बोलणं झालं आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.  

‘एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले दोन आमदार परत आले आहेत. त्यांनी जे काही घडलं ती भूमिका मांडली आहे. जे इथं नाहीत त्यांना परत येण्याचं आवाहन उद्धव ठाकरे व त्यांच्या नेत्यांनी केलं आहे. आम्ही या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं ते म्हणाले. ’सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. त्यामुळं संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं, त्यावर आम्हाला टीका करायची नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.