Nagpur Police: नागपुरातील गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा आहे. मात्र, असे असताना नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला, ज्यात पोलीस चक्क जुगार खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुव्यवस्थेचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असून संबंधित पोलिसांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीतच जुगार खेळताना दिसत आहेत. यातील वर्दीवर असलेले पोलीस कर्मचारी धूम्रपान करत आहे. हा व्हिडिओ नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधील असल्याचे सांगितले जात आहे. एका तक्रारदाराने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडीओ चित्रित केल्याची माहिती समोर आली. नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच पोलिसांनी जुगाराचा डाव मांडल्याने नागरिकांमध्य संतापाची लाट उसळली आहे. या पोलिसांविरोधात नेमकी कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याआधी दिल्ला पोलिसांचा एक लाजीरवाणा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत वाहतूक पोलीस वाहन चालकांकडून पैसे उकळत असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हेतर, तीन पोलीस कर्मचारी हे पैसे आपापसात वाटून घेताना दिसत आहे. हे प्रकरण दिल्लीतील गाजीपूर येथील आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी एका वाहन चालकाशी वाद घालताना दिसत आहे. त्यानंतर पोलीस कर्मचारी संबंधित वाहनचालका इशारा करतो. यानंतर तो पोलिसाच्या मागे असलेल्या खुर्चीवर पैसे ठेवून निघून जातो. थोड्या वेळ्यानंतर पोलीस कर्मचारी ते पैसे आपल्या खिशात ठेवतो. पुढे तीन पोलीस कर्मचारी त्याच जागेवर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत आणि पैशांची वाटणी करतात. याप्रकरमी तीन पोलीस कर्मचारी, दोन सहाय्यक उपनिरिक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती दिल्लीचे राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिली.