Maharashtra Police Recruitment in December: राज्यात काही जिल्ह्यात नुकतीच पोलिस भरती राबावण्यात आली. तब्बल ३५ हजार पदे भरण्यात आली होती. या भरतीत ज्यांना अपयश आले अशा तरुणांना आता पुन्हा पोलिस दलात भरती होण्याची संधी मिळणार आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात तब्बल साडेसात तर मुंबईसाठी १२०० पोलिसांची पदे भरती जाणार आहे.
राज्य सरकारने २०२२ मध्ये पोलिस भरतीची घोषणा केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबावण्यात आली. आता पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती होणार आहे. या भरतीत साडेसात हजार पदांची भरती होणार आहे. तर मुंबईसाठी बाराशे पदे भरली जाणार आहे. कोरोनामुळे राज्यात पोलिस भरती रखडली होती. तसेच अनेक जण निवृत झाल्याने मोठी पदे रिक्त झाली होती. मनुष्यबळ कमी झाल्याने २ वर्षांत १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. मात्र, या भरतीला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. सध्या राज्यात २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही भरती पूर्ण झाल्यावर राज्यात नवी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या सोबतच राज्यात असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्राची देखील क्षमता वाढवली जाणार आहे.
मुंबईत १२०० पदे भरली जाणार असल्याने मुंबई पोलिसांची क्षमता वाढणार आहे. गेल्या वर्षी ८ हजार पदांची भरती राबावण्यात आली होती. यातील काही जणांचे प्रशिक्षण होऊन सप्टेंबरमध्ये ते मुंबई पोलिस दलात दाखल होणार आहेत. मुंबईत ४,२३० पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी पोलिसांकडे ५ लाख ६९ हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार ५७२ पोलीस हवालदार, ९१७ चालक, ७१७ तुरुंग हवालदार आणि २४ बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत.