Pune Police House : जवळपास १२ वर्षांपासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा (एमपीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच पूर्ण होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकी या प्रकल्पासाठी मिळाली आहे. त्यामुळे तब्बल ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. या बाबतची माहिती ही रुरल एन्हान्सर्स संस्थेचे प्रमुख व विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली.
पुण्यात महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशन अंतर्गत पोलिसांसाठी तब्बल ५५०० घरे बांधून दिली जाणार आहे. हा प्रकल्प तब्बल १२ वर्षांपासून रखडला होता. या प्रकल्पासाठी निधीची कमतरता ही प्रमुख अडचण होती. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार ओरड गेल्या काही दिवसांपासून होत होती. त प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्रातील पोलीसांसाठी ५२४८ घरे आणि १६० दुकाने बांधली जाणार होती. तब्बल ११७ एकरांवरील हा प्रकल्प २०१२ पासून रखडलेल होता. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख आणि जॉईंट सेक्रेटरी कौस्तुभ धावसे यांनी एम पी एम सी या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले होते.
त्यानुसार ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील शासकीय निवासस्थानी नेदरलँडस्थित संस्थांचा आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचा गुंतवणूक सोहळ्यादरम्यान, एक्झिम फायनान्स यांच्यात २०० मिलियन युरोचा गुंतवणुक करारनामा राज्य शासनासोबत झाला. नेदरलँड आणि जर्मनीस्थित 'इन्वेस्ट इंटरनॅशनल' व इतर बँकांमार्फत ६०० ते ८०० कोटी रुपये या प्रकल्पात गुंतवली जाणार आहे. डेव्हलपमेंट क्रेडिट हाऊसिंग ईसीएच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन सहा ते सात महिन्यांमध्ये गुंतवणूक उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी अर्थात 'एमपीएमसी' अंतर्गत पुण्यातील लोहगाव येथे पोलिसांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा निर्णय २०१० मध्ये झाला. प्रकल्पाच्या विकासासाठी तत्कालीन, राज्य शासनाद्वारे बीईबिलो मोरया कंपनीची नियुक्ती झाली होती. बांधकाम व्यवस्थापनाच्या सुनिश्चितीसाठी बीईबिलो मोरया आणि 'एमपीएमसी' यांनी 'बेबेन को डेव्हलपर्स' (बीडीएल) नावाने 'एसपीव्ही' स्थापन केली. त्याअंतर्गत २७० कोटी रुपयांचा भरणा केला. लोहगाव येथे ११७ एकर जमीन विकत घेऊन हा प्रकल्प विकसित करण्याचे ठरले. प्रकल्पाच्या डिझाईनची जबाबदारी 'बीडीएल'ने 'व्हीके आर्किटेक्ट्स'कडे सोपवली होती.