beed news update : बीड जिल्ह्यातील पोलिस शिपाई ललिता साळवे यांनी लिंग बदल केला होता. यानंतर त्यांनी त्यांचे नाव देखील बदलले होते. ललित साळवे असे नामकरण केल्यावर ते चर्चेत आले होते. यानंतर वर्षभरात ललित साळवे यांनी लग्न केले असून आता त्यांच्या घरी गोड बातमी आली आहे. त्यांच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी या मुलाचे नाव आरुष ठेवले आहे.
जून १९८८ साली बीडमध्ये ललिता साळवे यांचा जन्म झाला होता. या ठिकाणी त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर त्या २०१० मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात महिला शिपाई म्हणून रुजू झाल्या होत्या. दरम्यान, च्या काळात त्या महिला नसून पुरुष असल्याचे त्यांना कळले होते. साळवे हे जन्मत:च मुलगा म्हणून जन्माला आले होते. मात्र त्यांच्या जननेंद्रियांचा विकास न झाल्याने ते स्वत:ला स्त्री समजत होते. दरम्यान, त्यांच्या घरच्यांनी देखील त्यांना एका मुलीप्रमाणे वाढवले होते.
असे असले तरी त्यांच्यात मुलाचे हार्मोन्स असल्याने आपण मुलगी नसून मुलगा असल्याची जाणीव त्यांना झाली. यामुळे त्यांनी लिंग बदल शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. या बाबत त्यांनी पोलिस खात्याला देखील परवानगी मागीतली. सुरवातीला ही परवानगी नाकारण्यात आली. मात्र, त्यांनी या बाबत थेट न्यायालयात जाऊन लढा दिला होता. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आणि न्यायालयाने त्यांना लिंग बदल करण्याची परवानगी दिली. यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया केल्यावर ‘ललित साळवे असे नामकरण केले.
या बाबत माहिती देतांना ललित सावळे म्हणाले, महिला ते पुरुष हा प्रवास खून संघर्षमय राहिला आहे. या काळात मला अनेकांनी मानसिक आधार दिला. एवढेच नाहीत तर सहकार्य देखील केले. लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यावर वर्षभरात मी लग्न केले. दरम्यान, आम्हाला बाळ व्हावे अशी आमच्या दोघांची इच्छा होती. आता आमची ही इच्छा देखील पूर्ण झाली आहे. माझ्या पत्नी सीमाने मुलाला जन्म दिला आहे. आता आम्ही माता-पिता झालो असून याचा आनंद होत आहे. आमच्या कुटुंबीयांना देखील याचा आनंद झाला आहे.
ललित साळवे यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर आणि त्यांच्या चमूने ही लिंगबदल शस्त्रक्रिया केली. या प्रकारची रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती.