महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं (MSCE) राष्ट्रीय साधन-सह-गुणवत्ता शिष्यवृत्ती (NMMSS) २०२४ परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर केला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना nmmsmsce.in या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल पाहता येणार आहे.
उमेदवार आपला निकाल पाहण्यासाठी या थेट लिंकचा वापर करू शकतात. निकाल पाहण्यासाठी सीट नंबर आणि आईचं नाव वापरून लॉग इन करावं लागेल. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
संबंधित शाळांना १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करावे लागतील. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, जात, आधार कार्ड यात काही बदल असल्यास ते ऑनलाइन अर्जांद्वारे पाठविता येतील, असं राज्य परीक्षा परिषदेनं या संदर्भातील अधिसूचनेत नमूद केलं आहे.
नाव, तारीख किंवा आधार कार्डमधील बदलांसाठी पोस्ट किंवा ईमेलद्वारे पाठविण्यात आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असं परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं आहे. सर्व सुधारणांचा विचार करून परिषद आपल्या अधिकृत संकेतस्थळावर निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करेल. या संदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.
'नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप स्कीम' अर्थात एनएमएमएसएस या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वर्षाला १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवंत असूनही पैशाच्या अभावी सातवीनंतर शिक्षण सोडावं लागू नये आणि माध्यमिक स्तरावर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळावं हा या योजनेमागचा उद्देश आहे.