Chhagan Bhujbal on Ajit Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीत मुख्यमंत्रिपदाची चर्चा तापली आहे. राज्यातील मुख्यमंत्रिपद महायुतीतील शिवसेना, भाजप किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार देखील मुख्यमंत्री होऊ शकतात, असे छगन भुजबळ म्हणाले. महायुतीतील घटक पक्ष पक्ष एकत्र बसतील आणि महाराष्ट्रा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? हे ठरवले जाईल. मुख्यमंत्री कोण होणार? हे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवू. अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे', असे छगन भुजबळ म्हणाले.
नुकतीच महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘आज आमचे सर्व आमदार बैठकीला आले. अनेक विधानपरिषद सदस्यही आले. यावेळी सर्वांनी ठरवले की, विधानसभेतील आमचे नेतृत्व अजित पवारच करतील, पण मुख्यमंत्री कोण होणार? हे आम्ही तिन्ही पक्ष मिळून ठरवू.’ तर राष्ट्रवादीचे पुणे अध्यक्ष दीपक मानकर यांनीही अजित पवारयांच्या समर्थनार्थ निवेदन दिले. 'अजित पवार असतील तर महाराष्ट्राला चांगली दिशा मिळेल, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दादांमध्ये काम करण्याची क्षमता आहे. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काय काम केले, हे आपल्याला ठाऊक आहे', असेही ते म्हणाले.
दीपक मानकर म्हणाले, महायुती सर्वांना सोबत घेऊन जात आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा निर्णय घेतील, सगळे एकत्र बसतील. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे सगळे सक्षम आहेत. मुख्यमंत्री कोण होणार? हे महायुतीचे नेते आणि भाजप नेतृत्व ठरवेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीआघाडीने २३० जागा जिंकून सत्ता कायम राखली. शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. मात्र, विधानसभा निवडणुकीतील निकाल याउलट ठरले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असे मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, तसे ठरले नाही.