मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 28 June 2022 Live Updates Marathi Breaking News

राज्यपालांना भाजपचं पत्र

Marathi news 28 june 2022 Live: ३० जूनला बहुमत चाचणी? राज्यपालांना भाजपचं पत्र

Maharashtra Daily News Live Update

Tue, 28 Jun 202205:00 PM IST

बहुमत चाचणीसाठी भाजपचे राज्यपालांना पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीहून परतल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. फडणवीसांसह तीन भाजपा नेते राजभवनावर दाखल झाले आहेत. मागील अर्ध्या तासापासून राजभवनावर ही बैठक सुरू आहे. या बैठकीत भाजपाने बहुमत चाचणी घेण्यासाठी राज्यपालांना पत्र देण्यात आलं आहे.

Tue, 28 Jun 202201:14 PM IST

Mumbai Building Collapse: कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसंच, जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Tue, 28 Jun 202210:13 AM IST

Sanjay Raut: ईडीसमोर हजर राहण्यासाठी संजय राऊत यांना तीन दिवसांची मुदत

पत्रा चाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावलं होतं. त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार, ईडीनं त्यांना वेळ दिला असून १ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचनाही ईडीनं राऊत यांना दिल्या आहेत.

Tue, 28 Jun 202209:35 AM IST

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले, अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला पोहोचले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीनं ते चर्चा करणार असल्याचं बोललं जातं.

Tue, 28 Jun 202207:43 AM IST

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे कर्करोगाच्या उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कर्करोगावरील उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. इतर संसर्गांचा धोका टाळण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीना भेटीसाठी न येण्याचे आवाहन रुग्णालय आणि कुटुंबियांकडून करण्यात आले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी पुण्यात आले असता डॉ. आमटे यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे रुग्णालयात दाखल केले असता त्यांना न्युमोनिया आणि ल्युकेमियाची सुरुवात असल्याचे निदान झाले होते.

<p>ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे</p>
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे

Tue, 28 Jun 202206:15 AM IST

Share Market News: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १७५ अंकांनी खाली

आठवड्याच्या पहिल्या दिवशी, काल सावरलेला शेअर बाजार आज पुन्हा घसरला आहे. सेन्सेक्स १७५ अंकांनी घसरला असून निफ्टी ५० अंकांनी घसरून १५,७८६ वर ट्रेड करत आहे.

Tue, 28 Jun 202205:10 AM IST

State Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक.

शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं असताना राज्य मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक होत आहे. दुपारी अडीच वाजता ही बैठक होईल. यात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

Tue, 28 Jun 202205:03 AM IST

Pandharpur Wari 2022: वारीच्या वाटेवरच्या संविधान समता दिंडीत सहभागी व्हा; हभप श्यामसुंदर सोन्नर व ज्ञानेश्वर बंडगर महाराजांचं आवाहन

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा मुख्य प्रवाह आहे तर वारी हा महाराष्ट्राचा सार्वजनिक उत्सव आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा मूल्यविचार वारकरी संतांनी त्यांच्या अभंगातून मांडला. तोच विचार वारीच्या माध्यमातून सेलिब्रेट करायला हवा या भावनेनं 'संविधान समता दिंडी' संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून पंढरपूरला पोचणार आहे. काल महात्मा फुले वाड्यातून या दिंडीला सुरुवात झाली. ही संविधान समता दिंडी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून १० जुलैपर्यंत पंढरपूरला पोचणार आहे.