गृहमंत्रीपद भाजपकडंच असायला हवं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यामागचं कारण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गृहमंत्रीपद भाजपकडंच असायला हवं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यामागचं कारण

गृहमंत्रीपद भाजपकडंच असायला हवं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यामागचं कारण

Dec 07, 2024 11:31 PM IST

Devendra Fadnavis on Home Ministry : खातेवाटप व गृहमंत्रालयाबाबत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी एकदाही जाहीर भाष्य केलं नाही. मात्र नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होऊन दोन दिवस झाले तरी खातेवाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. गृहमंत्रालयासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्याचबरोबर यावरून शिंदे नाराज असल्याचंही बोललं जात आहे. यासाठी त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याची भूमिका घेतली होती. मात्र, भाजपा पक्षश्रेष्ठीं व शिवसेना (शिंदे) आमदारांच्या दबावामुळे शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. आता खातेवाटप व गृहमंत्रालयाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील होणार की, नाही याबाबत सस्पेन्स होता. मात्र देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र तरी गृहमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. महाआघाडी सरकारचा कार्यकाळ वगळता मागील साडे सात वर्षे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. आताही भाजप या पदावरील दावा सोडण्यास तयार नसल्याचे दिसते. याबाबत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी एकदाही जाहीर भाष्य केलं नाही. मात्र नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा हट्ट धरला आहे का?या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, शिंदे यांनी असं कुठलंही मंत्रीपद मागितलेलं नाही.  त्यांनी फक्त तीन ते चार खात्यांवर चर्चा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

गृहमंत्रीपद भाजपकडेच असावं, कारण..

फडणवीस म्हणाले, तसं बघायला गेलं तर गृहमंत्रीपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु, तसा काही हट्ट नाही. आजवर हे खातं आमच्याकडे राहिलं आहे. आम्ही तिघेही एकत्रच आहोत. मात्र, गृहमंत्रीपद सांभाळत असताना केंद्र सरकारशी, केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय ठेवावा लागतो. महाराष्ट्रात नक्षलवादाची समस्या आहे. मुंबईसारखं मोठे शहर सांभाळायचं आहे. माझा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी नेहमी संपर्क असतो. आम्ही चांगल्या प्रकारे समन्वय राखतो. मी केंद्रीय गृह मंत्रालयाशी चांगल्या प्रकारे समन्वय साधू शकतो. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार देखील ते करू शकतात, मात्र माझा केंद्रीय नेतृत्वाशी जास्तीत जास्त संबंध येतो. त्यामुळे गृहमंत्रालय हे भाजपकडेच असावं असं मला वाटतं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर