Sharad Pawar News: विरोधी पक्ष महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दबाव आणला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील कोणीही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक नाही, राज्यात सत्ताबदल घडवून आणण्यावर आमचा भर आहे, असे शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील जागावाटपाची चर्चा लांबणीवर पडली आहे. येत्या २७ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करेल.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. तर, काँग्रेसने या मुद्द्यावर वेगळी भूमिका घेतली होती. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'आमच्या पक्षाकडून मुख्यमंत्रिपदासाठी कोणीही इच्छूक नाही.आम्हाला फक्त सरकारमध्ये बदल घडवायचा आहे. आम्हाला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी चा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीला पर्याय देण्यावर भर द्यावा', असे शरद पवार म्हणाले. हा मुद्दा मुख्यमंत्रिपदाचा उपस्थित करण्याची गरज नव्हती. आज जनतेला पर्याय हवा आहे आणि तो त्यांना कसा देता येईल यावर लक्ष केंद्रित करूया, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुढे शरद पवार म्हणाले की, 'महाविकास आघाडीतील घटक पक्ष लवकरच जागावाटप निश्चित करेल. बदलापूरच्या घटनेमुळे मित्रपक्षांमधील जागावाटपावर होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली. आता ती २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसणार आहेत. त्यांच्याकडून लवकरच जागांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माझी अपेक्षा आहे.' महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता आहे.