Raj Thackeray: मनसेच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. गुरुवारी संध्याकाळी ते नाशकात दाखल झाले. शुक्रवारी सकाळी त्यांनी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी अनेक मुद्द्यावर भाष्य करताना सत्ता माझ्या हाती द्या, सर्व भोंगे एका रात्रीत बंद करतो, असे म्हटले आहे.
आम्ही वारंवार सिद्ध करून दाखवलं, समर्पक उत्तरं दिली तरी मुख्य माध्यमांमधून 'आम्ही आंदोलन अर्धवट सोडतो' हा अपप्रचार केला गेला. पण मग शिवस्मारकाचं काय झालं? त्रासदायक भोंगे बंदी होणार होती त्याचं काय झालं? त्रासदायक भोंगे आंदोलनात उद्धव ठाकरे सरकारने माझ्या १७००० सहकाऱ्यांवर खटले भरले. असा काय गुन्हा होता त्या मुलांचा? आता कोणताच नेता त्याबद्दल बोलत नाही. माझं सरकार येऊ दे, त्रासदायक भोंगे बंद करून टाकेन, असे राज ठाकरे म्हणाले.
सोशल मीडियाचा वापर प्रभावी करा. लोकांना त्यातून माहिती मिळाली पाहिजे फक्त दणदणीत संगीत, रुबाबदार चाल वगैरेने फक्त मनोरंजन होईल. आपण राजकारण-समाजकारणात आहोत. म्हणून मी श्री. केतन जोशी ह्यांची 'सोशल मीडिया' मार्गदर्शन शिबिरं आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी आयोजित करणार आहे. ज्यांना राजकीय महत्त्वकांक्षा आहे त्यांनी तिथे यावं", असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
"राजकारणात प्रचंड संयम लागतो. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संयम असलाच पाहिजे. आज मोदींच्या रूपात भाजपा जे यश अनुभवतोय त्यात मोदींचं श्रेय आहेच, पण अनेक दशकांच्या कार्यकर्त्याचीही मेहनत, संयम आणि संघर्ष पण आहे. मी आत्मविश्वासाने सांगतो मी यश खेचून आणणार. आजकाल सध्या पक्षांतराचा ट्रेंड आहे. पण दुसऱ्यांची पोरं मला कडेवर घेऊन फिरायची नाहीत. मला राजकारणात माझे सहकारी मोठे करायचे आहेत.महाराष्ट्रात तीनच पक्ष प्रामुख्याने निर्माण झाले. तुम्ही म्हणाल ह्यादरम्यान राष्ट्रवादी हा पक्ष निर्माण झाला.पण निवडून येणाऱ्या लोकांची मोळी होती. त्यामुळे एक जनसंघ, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेच पक्ष तळागाळातून निर्माण झाले. आणि त्यात विशेष ह्या पक्षातील कार्यकर्ते ९९% सर्वसामान्य घरातील होते", असे राज ठाकरे म्हणाले.
"मराठा आरक्षणावरून फक्त राजकारण सुरु आहे. मी जरांगे-पाटील ह्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर सांगितलं होतं. आरक्षण मिळणार नाही. ह्याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असं नाही. तर, तांत्रिकदृष्ट्या ते तितकंच किचकट आहे. राज्यात जी मराठा आरक्षणावरून जी आश्वासनं दिली जातात ती सर्व खोटी आहेत. त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. पण केंद्राने जर मराठा आरक्षण द्यायचं ठरवलं तर त्यांना प्रत्येक राज्यातील आरक्षणाची मागणी असलेल्या जातींना आरक्षण द्यावं लागेल, जे नेत्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरेल म्हणून हा प्रश्न रखडवत ठेवला जातो. आणि जाती भेद निर्माण करून मतांचं राजकारण केलं जातं. माझ्या पक्षातील सहकाऱ्यांनी कुणालाही जातीने पाहू नये, जातीवरून भेद करू नये. मला ते चालणार नाही. हा खालच्या जातीचा, तो वरच्या जातीचा हे कुणी ठरवलं ? आपण शिवछत्रपतींचं नाव घेतो ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचं स्वराज्य उभं केलं", असेही राज ठाकरे म्हणाले.