Ambulance Explodes in Jalgaon: जळगावात रुग्णवाहिकेला आग लागून काही मिनिटांतच भीषण स्फोट झाला. सुदैवाने, एक गरोदर महिला आणि तिचे कुटुंब थोडक्यात बचावले. स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती आहे. या घटनेत कोणीही जखमी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. या स्फोटाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जळगावच्या दादावाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. रुग्णवाहिका एरंडोल शासकीय रुग्णालयातून गरोदर महिला व तिच्या कुटुंबीयांना जळगाव जिल्हा रुग्णालयात घेऊन जात होती. दरम्यान, चालकाला आपल्या वाहनाच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे दिसले आणि तो ताबडतोब खाली उतरला आणि त्यांने प्रवाशांनाही खाली उतरवले. तसेच आजूबाजूच्या लोकांना वाहनापासून दूर राहण्याचा इशारा दिला. रुग्णवाहिकेला लागलेली आग काही मिनिटांतच ऑक्सिजन टाकीपर्यंत पसरली आणि मोठा स्फोट झाला. सुदैवाने, गरोदर महिला आणि तिचे कुटुंब थोडक्यात बचावले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत रुग्णवाहिकेला आग लागल्याचे दिसत आहे. मात्र, काही क्षणांतच रुग्णवाहिकेचा स्फोट होतो. हे पाहिल्यानंतर आजूबाजुला उपस्थित असलेले लोक घाबरून पळू लागतात. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचा स्फोट झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. तर, काही अंतरावरील घरांच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात गेल्या महिन्यात अशीच एक घटना घडली. पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला आग लागली आणि काही मिनिटांतच अचानक स्फोट झाला. चालक विवेक गुप्ता यांना आपल्या गाडीतून अचानक धूर निघताना दिसला आणि अचानक धुराचे कारण न समजल्याने ते रुग्णवाहिकेतून खाली उतरले. गुप्ता यांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. ही आग रुग्णवाहिकेच्या ऑक्सिजन टँकपर्यंत पसरली आणि अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाला. त्याला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमर जयस्वाल (वय, २०) असे जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. ही रुग्णवाहिका कोणत्याही रुग्णालयाशी संलग्न नसून खासगी रुग्णवाहिका सेवा म्हणून चालविण्यासाठी दिल्लीहून आणण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.