Pune Murder: पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर येत आहे. अवघ्या ५०० रुपयासाठी एका गॅरेज कामगाराने टुरिस्ट व्यावसायिकाची हत्या केली. त्यानंतर आरोपीने स्वत:लाही वार केले. ही घटना मंगळवारी रात्री २४ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तत्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
विनायक उर्फ संतोष बबन गोडसे (वय,४२) असे हत्या झालेल्या दुरिस्ट व्यावसायकाचे नाव आहे. तर, मयुर अशोक सोमवंशी आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गोडसेने एक महिन्यापूर्वी त्याची गाडी पुणे-नाशिक महामार्गावरील हैदरभाई यांच्या गॅरेजवर लावली होती. गाडी दुरुस्तीसाठी एकूण ७ हजार ६०० खर्च झाला. त्यावेळी संतोषने ७ हजार १०० रुपये रोख देऊन ५०० नंतर देतो असे, गॅरज कामगार मयुर सोमवंशीला सांगितले. उर्वरित ५०० रुपयांसाठी मयुरने संतोषकडे फोनवरूनसारखा तगादा लावायचा.
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मुयरने संतोषला फोनवरून शिवीगाळ केली. तसेच तू गॅरेजवर ये, मग तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर संतोष लगेच गॅरेजमध्ये पोहचला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि मयुरने संतोषच्या छातीत चाकू भोसकू स्वत:वरही वार करून घेतले. पोलिसांनी त्याला तत्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहे. आरोपी मयुर सोमवंशी याच्याविरोधात भादंवि कलम ३०२, ५०४, ५०६, ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहे.
संबंधित बातम्या