मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई : नायर रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

मुंबई : नायर रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 29, 2023 11:55 PM IST

Nair hospital : नायर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून मंगळवारी एका रुग्णाने उडी मारून आत्महत्या केली. हृदयरोग विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते.

रुग्णाची आत्महत्या
रुग्णाची आत्महत्या

नायर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून मंगळवारी एका रुग्णाने उडी मारून आत्महत्या केली. अविनाश सावंत (४०) असे मृताचे नाव आहे. अविनाश हा सिंधुदुर्गातील पंचशील नगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, रुग्णाला १ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर ८ मार्च रोजी त्यांना हृदयरोग विभागात हलवण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अविनाश सावंत यांच्या अँजिओग्राफी रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळून आले, त्यानंतर डॉक्टरांनी अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. १५ मार्च रोजी अँजिओग्राफी करण्यात आली, ती यशस्वी झाली. यानंतर सावंत यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. मात्र, मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांनी शौचालयात जाऊन खिडकी उघडली. यावेळी दुसऱ्या एका रुग्णाला हा सर्व प्रकार पाहून संशय आला. मात्र, कर्मचाऱ्यांना सावध करण्याआधीच सावंत यांनी उडी मारली.

प्राथमिक तपासात सुसाईड नोट सापडली नसल्याचे आग्रीपाडा पोलिसांचे म्हणणे आहे. सावंत यांनी उचललेल्या या पाऊलामुळे त्यांचे कुटुंबीय आणि डॉक्टरांना धक्का बसला आहे. वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सावंत काही वैयक्तिक समस्येने झगडत होते. तसेच सततच्या आजारपणामुळे ते नैराश्यात असायचे. या कारणांमुळे त्याने टोकाचे पाऊल उचललं असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp channel