Maharashtra Monsoon Session: फडणवीस- उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल, चर्चांना उधाण!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Monsoon Session: फडणवीस- उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल, चर्चांना उधाण!

Maharashtra Monsoon Session: फडणवीस- उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल, चर्चांना उधाण!

Jun 27, 2024 04:50 PM IST

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray: विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, त्यानंतर ते एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले.

उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल
उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल

Maharashtra Monsoon Session 2024: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून २०२४) सुरुवात झाली. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राज्याच्या राजकारणात एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट झाली. एवढेच नव्हेतर दोघेही एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. यादरम्यान फडणवीस आणि ठाकरे यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झाले. मात्र, त्याच वेळी उद्धव ठाकरेही तिथे पोहोचले. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून ही भेट योगायोगाने झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मी आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. पण यावरून अनेकांना ते एक गाणं आठवले असेल ना ना करते प्यार..., पण असे काही होणार नाही. ही भेट फक्त एक योगायोग आहे. भिंतीला कान असतात, असे म्हणतात. मात्र, लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. आम्ही या पुढच्या आमच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू, असे उद्धव ठाकरे हसत म्हणाले.

यंदाचे पावसाळी अधिवेशन महत्वाचे

या अधिवेशनात महायुती सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. या अधिवेशनात सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन महत्वाचे मानले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अनुक्रमे ठाकरे आणि पवार गटात परतण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला ४८ पैकी ३० जागा मिळाल्या. सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या नाशिक-पुणे-कोल्हापूर पट्ट्यातील पाच जागांसह आठ जागांवर पवार गटाने विजयाचा दावा केला. याउलट अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला या भागात एकही जागा मिळवता आली नाही, यामुळे पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर