सरकार चुकलं तर विधिमंडळाच्या बाहेर चुकांची जाणीव करून देऊ; राज ठाकरेंचा सरकारला इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सरकार चुकलं तर विधिमंडळाच्या बाहेर चुकांची जाणीव करून देऊ; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

सरकार चुकलं तर विधिमंडळाच्या बाहेर चुकांची जाणीव करून देऊ; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

Dec 05, 2024 08:27 PM IST

Raj Thackeray On Devendra Fadnavis: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

सरकार चुकलं तर विधिमंडळाच्या बाहेर चुकांची जाणीव करून देऊ- राज ठाकरे
सरकार चुकलं तर विधिमंडळाच्या बाहेर चुकांची जाणीव करून देऊ- राज ठाकरे

Raj Thackeray News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले. शपथविधी सोहळ्यानंतर काही मिनिटातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. पुढील पाच वर्ष सरकारच्या चांगल्या उपक्रमाला माझा पाठिंबा असेल, पण सरकार चुकलं तर विधिमंडळाच्या बाहेर चुकांची जाणीव करून देऊ, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

राज ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे म्हणाले की, 'आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती. पण तेव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडले त्यामुळे ती संधी हुकली. पण यावेळी महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिले आहे, त्याचा या राज्यासाठी, मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.'

 

राज ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा

पुढे राज ठाकरे म्हणाले की, 'पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकत आहे, लोकांना गृहीत धरले जाते, असे जर जाणवले, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसले तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की', अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे.

शपथविधीनंतर लगेच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीस यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हे सरकार गतिमान असल्याचे दाखवून दिले. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. तसेच अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगाने काम करावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर