MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला मराठवाड्यातून विरोध होत असल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्याचे पडसाद बीड येथे पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यात राज ठाकरेंचा ताफा गेला असता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकून जोरदार आंदोलन केले. याप्रकरणी ठाकरे गटातील आठ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली.
राज ठाकरे हे मध्य महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. बीड येथे एका हॉटेलकडे जात असताना ठाकरे गटाच्या काही समर्थकांनी त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर सुपारी फेकल्या, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. ज्या गाडीवर सुपारी फेकण्यात आल्या, त्या गाडीत राज ठाकरे नव्हते. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा प्रभाव कमी करण्यासाठी राज यांनी सुपारी घेतल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सुरुवात त्यांनी केली आहे, आता शेवट आम्ही करू, असा थेट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला. याप्रकरणी राज ठाकरे यांनी बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांची संवाद साधला. ही घटना घडण्यापूर्वी आपले इंटेलिजन्स नव्हते का? असा प्रश्न विचारत अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. भविष्यात असे प्रकार होऊ नये, त्यासाठी खबरदारी घ्या, अशाही सूचना राज ठाकरेंनी पोलिसांना दिल्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पेटला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. दुसरीकडे ओबीसी समुदाय त्यांचे आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करू लागले. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ओबीसींसह सर्वच समाजातील लोक नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, आरक्षणाची गरजच नाही. आपल्याला केवळ पैशांचे व्यवस्थित नियोजन केले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले होते.