मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Polls 2022: राष्ट्रवादी मैदानात; रामराजे स्वत: हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला

MLC Polls 2022: राष्ट्रवादी मैदानात; रामराजे स्वत: हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 17, 2022 05:56 PM IST

Ramraje Naik Nimbalkar meets Hitendra Thakur: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे.

Ramraje Naik Nimbalkar - Hitendra Thakur
Ramraje Naik Nimbalkar - Hitendra Thakur

Maharashtra Vidhan Parishad Election 2022: राज्यसभा निवडणुकीत एक जागा गमवावी लागल्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. येत्या विधान परिषद निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सर्व जागा निवडून आणायच्याच या निर्धारानं तिन्ही पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले माजी उपसभापती व शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वत: बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. (Ramraje Naik Nimbalkar meets Hitendra Thakur)

राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ महाविकास आघाडीच्या बाजूनं असतानाही शिवसेनेला सहावी जागा गमावावी लागली. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदारांनी शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला मतदान केलं नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षानं आपापली सोय करावी, अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याचं समजतं. स्वत:चे दोन उमेदवार निवडून आणण्याएवढी मतं शिवसेनेकडं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडंही पुरेशी मतं आहेत. मात्र, भाजपनं उभा केलेला पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले आहेत. ते सर्वार्थानं सक्षम उमेदवार आहेत. राष्ट्रवादीच्या काही आमदारांची मतं ते सहज फिरवू शकतात, असं बोललं जात आहे. त्याचा फटका रामराजे निंबाळकर किंवा एकनाथ खडसे यांना बसू शकतो. मात्र, खडसे यांना मानणारे काही आमदार भाजपमध्ये आहेत. त्यांना खडसे आपल्या बाजूला वळवू शकतात. त्यामुळं खरी कसरत रामराजे यांनाच करावी लागणार आहे. त्यामुळंच त्यांनी स्वत: छोट्या पक्षांच्या गाठीभेटी सुरू केल्याचं समजतं.

राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या आमदारांचं मत निर्णायक ठरू शकणार आहे. हे लक्षात घेऊन रामराजे यांनी विरारला जाऊन ठाकूर यांची भेट घेतली. विवा कॉलेजमध्ये बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. बविआनं राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत द्यावं, अशी विनंती त्यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. 

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप, भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनीही ठाकूर यांची भेट घेतली आहे. ठाकूर यांनी या नेत्यांना नेमकं कोणतं आश्वासन दिलं हे गुलदस्त्यात आहे. 

IPL_Entry_Point