Vidhan Parishad election 2024 : लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेले भाजप, शिंदे सेना आणि मनसे हे तिन्ही पक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं आधीच उमेदवारी जाहीर केली असतानाही भाजप व शिंदे गटानं इथून उमेदवार उतरवला आहे. त्यामुळं आता राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या चारपैकी तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा भारतीय जनता पक्षानं आज केली. कोकण पदवीधर मतदारसंघातून पक्षानं निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरमधून किरण शेलार व मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांच्या नावांची घोषणा केली. तर, शिंदे यांच्या शिवसेनेनं पक्षाचे सचिव संजय मोरे यांना रिंगणात उतरवलं आहे.
यापैकी कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं अभिजित पानसे यांना आधीच उमेदवारी दिली आहे. त्यामुळं भाजप इथून माघार घेईल अशी चर्चा होती. किंवा राज ठाकरे यांनी तशी भाजपशी चर्चा केली असावी असंही बोललं जात होतं. मात्र, आता भाजपनं उमेदवार जाहीर केल्यानं हे दोन्ही पक्ष समोरासमोर लढणार हे स्पष्ट झालं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून पक्षाचे सचिव संजय मोरे यांना उतरवण्याची तयारी केली आहे. मोरे यांनी याआधी देखील इथून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा एकदा ते मैदानात उतरणार आहेत. त्यामुळं महायुतीच्या तिन्ही पक्षातील उमेदवार समोरासमोर आले आहेत. तिन्ही उमेदवार अखेरपर्यंत रिंगणात राहिल्यास कोणाला फटका बसणार, याविषयी आता उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. केवळ नरेंद्र मोदी या एका व्यक्तीसाठी मी भाजपला पाठिंबा देत आहे, असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतर मनसे हा महायुतीचा भाग नसेल असं बोललं जात आहे. स्थानिक निवडणुका मनसे स्वबळावरच लढवण्याची शक्यता आहे.
मुंबई पदवीधर, कोकण विभागीय पदवीधर, नाशिक विभागीय शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत आहे. बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पुढील कार्यक्रमाचं वेळापत्रक असं…
शुक्रवार, ७ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल.
उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार, १० जून २०२४ रोजी केली जाईल.
अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून २०२४ अशी आहे.
बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल.
सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल.
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होईल.
संबंधित बातम्या