मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election: विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार, भाजप-आघाडी टक्कर होणार

MLC Election: विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार, भाजप-आघाडी टक्कर होणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 13, 2022 03:35 PM IST

Maharashtra MLC Polls: राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीतून अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी माघार घेतली आहे.

Vidhan Bhavan
Vidhan Bhavan

Maharashtra Vidhan Parishad Election 2022: राज्य विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणातून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी माघार घेतली आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे डमी उमेदवार शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. मात्र, तरीही दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्यानं पुन्हा एकदा महाविकास आघाडी व भाजप यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. (Maha Vikas Aghadi Vs BJP in MLC Election)

विधान परिषदेच्या दहा रिक्त जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होत आहे. संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन व काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून जाऊ शकणार आहे. महाविकास आघाडीच्या मदतीनं काँग्रेसचा दुसरा उमेदवारही निवडून येऊ शकतो. मात्र, भाजपनं पाचवा उमेदवार दिल्यानं ही निवडणूक रंगतदार होणार आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला यश आलं नाही.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या क्षणी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनीही उमेदवारी मागे घेतली. मात्र, काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवार व भाजपनं पाचवा उमेदवार कायम ठेवल्यानं निवडणूक घ्यावी लागणार आहे.

विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक आमदाराला प्रत्येकी २७ मतांची गरज आहे. महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता त्यांचे सहा उमेदवार निवडून येण्यास अडचण वाटत नाही. मात्र, दहाव्या जागेचा निकाल पुन्हा एकदा छोटे पक्ष व अपक्ष आमदारांच्या भूमिकेवर ठरणार आहे. राज्यसभेप्रमाणे इथंही बाजी मारण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. महाविकास आघाडी भाजपला कशी रोखते, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

पक्षनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे:

भाजप: प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

शिवसेना: सचिन अहिर, आमशा पाडवी

काॅंग्रेस: भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

राष्ट्रवादी काँग्रेस: रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या