vijaykumar gavit comment on aishwarya rai : राज्य मंत्रिमंडळातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री विजय कुमार गावित यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याचं रहस्य सांगणारा अजब दावा सोमवारी केला होता. त्यांच्या व्यक्तव्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यांनी केलेले हे व्यक्तव्य आता त्यांच्या अंगलट आले आहे. राज्य महिला आयोगाने मंत्री विजय कुमार गावित यांना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. आयोगाने मंत्र्यांना नोटीस पाठवून तीन दिवसांत उत्तर मागवले आहे.
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारमधील आदिवासी व्यवहार मंत्री विजय कुमार गावित अभिनेत्री ऐश्वर्या रायवर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. आता राज्य महिला विजय कुमार गावित यांना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबद्दल केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
धुळे जिल्ह्यातील मच्छीमार समाजाच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना गावीत म्हणाले की, ‘मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. बाई माणसं चिकने दिसायला लागतात. डोळे तरतरीत दिसायला लागतात. कुणीही बघितलं तरी पटणार! तुम्ही ऐश्वर्या राय बघितलीय का? ऐश्वर्याचे डोळे खूप सुंदर आहेत. ती कर्नाटकातील मंगळुरूच्या किनारी भागात लहानाची मोठी झालीय. ती रोजच्या रोज मासे खायची आणि त्यामुळंच तिचे डोळे खूप सुंदर आहेत,’
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या विधानाची दखल घेत त्यांना नोटिस धाडली आहे. त्यांना यावर तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या नोटीसीत गावीत यांना चांगलेच फटकारले आहे.
नोटीसीत म्हटले आहे की, धुळे जिल्हयातील अंतुर्ली येथील सभेत उपस्थितांना संबोधित करताना आपण महिलांचा अवमान होईल, असे वक्तव्य केले असल्याबाबतचे व्हिडिओ माध्यमांवरुन प्रसारित झाले आहेत. आपण केलेल्या वक्तव्यांमुळे समाजातील सर्व स्तरांतुन तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा आलेख त्या राज्यातील स्त्रियांची स्थिती आणि सुरक्षितता यावरुन ठरविला जातो. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा व वर्तनाचा दिर्घ परिणाम समाजमनावर होतो आणि त्यातुनच सुदृढ वैचारिक समाजाची निर्मिती होत असते. सकल समाज घडवण्याची प्राथमिक जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळेच लोकप्रतिनीधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. तरी आपण केलेल्या वक्तव्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार आयोगास तीन दिवसात प्राप्त होईल, अशारितीने खुलासा सादर करावा.
गावित (वय ६८) हे धुळ्यातील अंतरुली येथे आदिवासी मच्छिमारांना मासेमारीचे साहित्य वाटप करण्यासाठी आले होते. मासे खाल्ल्याने त्वचाही सुधारते, कारण माशांमध्ये तेल असते, त्यामुळे डोळ्यांना आणि त्वचेला खूप फायदा होतो, असेही मंत्री म्हणाले. गावित हे नंदुरबारचे भाजपचे आमदार आहेत आणि ते उत्तर महाराष्ट्रातील एक प्रभावी आदिवासी नेते मानले जातात.
संबंधित बातम्या