Manoj Jarange News: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेवर मराठा सामजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली. तसेच आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर जड जाईल, असाही इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी काल मस्साजोग गावच्या नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, 'खंडणीच्या प्रकरणातून हा सर्व प्रकार घडल्याचा संशय आहे. आम्ही एक होतकरू मुलगा गमावला आहे. माझे एक सांगणे आहे की, तुम्ही जे म्हणता ना जातीवाद जातीवाद ते जरा थांबवा. लोकांना चांगले धडे दिले पाहिजेत. जर अशा प्रकारे अपहरण करून हत्या व्हायला लागल्या आणि दहशत व्हायला लागली तर समाजाला ना विलाजाने उठावे लागेल.'
पुढे सरकारला इशारा देत जरांगे पाटील म्हणाले की, 'माझे लोक मरायला लागले आहेत आणि तुम्ही आरोपींना मोकाट फिरू देता. मात्र, असेल तर जड जाईल. तुम्ही विचारही केला नसेल त्या पलिकडे ही प्रक्रिया जाईल.आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. आरोपींना पोलिसांच्या हवाली केले पाहिजे', असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख आपल्या कारमधून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारला अडवले. त्यानंतर संतोष देशमुख यांना कारमधून बाहेर काढत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याप्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी संतोष देशमुख यांचा शोध घेतला असता काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आरोपांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या.
संबंधित बातम्या