Mumbai 6 Lok Sabha Constituencies Election Date: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात कोणत्या दिवशी मतदान होईल? हे जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात (१९ एप्रिल २०२४) रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर येथे निवडणुका होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात (२६ एप्रिल २०२४) बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी मतदान केले जाईल. याशिवाय, तिसऱ्या टप्प्यात (७ मे २०२४) रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये मतदान होईल. चौथ्या टप्प्यात (१३ मे २०२४) नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड आणि पाचव्या टप्प्यात (२० मे २०२४) धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण येथे निवडणूक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती करून अनुक्रमे २३ आणि १८ जागा जिंकल्या होत्या. त्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षात फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हात मिळवून महाविकास आघाडीची स्थापना केली.
दरम्यान, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन महायुतीची स्थापना केली. गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली.
२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अल्पकालीन सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत फूट पडली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पक्ष वाचवण्यात यश मिळवले होते आणि अजित पवार यांना पक्षात परतावे लागले. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात
गेल्या वर्षी अजित पवार यांनी इतर ८ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन काकांचा पक्ष तोडण्यात यश मिळवले. २०१९ नंतर त्यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत नाव आणि चिन्ह दिले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बहुपक्षीय विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला दिशा देणारा ठरणार आहे.