Weather News: महाराष्ट्रात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. येत्या तीन-चार दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात येत्या तीन- चार दिवसांत हवामान कसे असेल, याबाबत पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.के एस. होसाळीकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून माहिती दिली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या तीन- चार दिवसांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटांसह पाऊस पडेल, असाही इशारा देण्यात आला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुरुवारी (१५ ऑगस्ट २०२४) राज्यातील हवामान कोरडे असेल. जोरदार पावसाची शक्यता नसली तरी, काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारून चालणार नाही. यानंतर शुक्रवारी (१६ ऑगस्ट २०२४) देखील राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिल असा अंदाज आहे. तरीही काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. मात्र, शनिवारी (१७ ऑगस्ट २०२४) सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या ५ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी (१८ ऑगस्ट २०२४) तारखेला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या ६ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे असेल.
हवामान वेधशाळेने पुढील सात दिवसांत पश्चिम हिमालय प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पूर्व भारतासह इतर भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हरियाणा, राजस्थान आणि ईशान्य भारतातही पाच दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. केरळ, तामिळनाडू, दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि रायलसीमा मध्ये पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे, तर जम्मू-काश्मीर, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या भागात या आठवड्यात विखुरलेल्या मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, कोकण, गोवा आणि गुजरात प्रदेशात हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये विखुरलेल्या ते बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आठवडाभर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली.