शिवराज राक्षे याने ६५ वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत मानाची गदा पटकावली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये पार पडला. नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये ६-० अशा फरकाने शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरीची गदा दुसऱ्यांदा उंचावली.
धाराशीवमधील गुरुवर्य के टी पाटील क्रीडा नगरीतील तुळजाभवानी स्टेडियममध्ये महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ९५० मल्ल व ५५० पंच दाखल झाले होते. महाराष्ट्र केसरी फायनलमध्ये माती गटातून हर्षवर्धन सदगीर याने धडक मारली. तर गादी गटातून शिवराज राक्षे अंतिम फेरीत पोहचला होता. या दोघांमध्ये प्रतिष्ठेच्या लढतीत शिवराज राक्षे याने बाजी मारत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. या विजयानंतर शिवराज राक्षे याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने पहिल्यापासून आपल्या ताकदीच्या जोरावर हर्षवर्धनवर वर्चस्व राखले. स्पर्धेतील विजेत्या मल्लासाठी स्कॉर्पिओ गाडी व मानाची गदा व अन्य विजेत्या मल्लांसाठी दोन कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत फूट पडल्याने गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतल्या जात आहेत. दोन्ही गट महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतात. त्यातील पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा सिकंदर शेखने जिंकली आहे.
माती आणि गादी गटातून महाराष्ट्र केसरी सेमी फायनलचे सामचे पार पडले. माती गटातून गणेश जगताप आणि हर्षवर्धन सदगीर आमनेसामने होते. या सामन्यात हर्षवर्धनने गणेश जगतापचा ६-२ असा पराभव केला. तर गादी गटातून सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षे याने पृथ्वीराज मोहोळ याच्यावर १०-० अशी एकतर्फी मात केली.