मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पाणी द्या नाहीतर आम्ही एनओसीची वाट बघणार नाही, थेट कर्नाटकात जाऊ, ४० गावच्या ग्रामस्थांचा अल्टिमेटम!
४० गावच्या ग्रामस्थांचा अल्टिमेटम!
४० गावच्या ग्रामस्थांचा अल्टिमेटम!

पाणी द्या नाहीतर आम्ही एनओसीची वाट बघणार नाही, थेट कर्नाटकात जाऊ, ४० गावच्या ग्रामस्थांचा अल्टिमेटम!

24 November 2022, 23:37 ISTShrikant Ashok Londhe

Maharashtra Karnataka border issue : जत तालुक्यातील ४० गावच्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे की, शेवटची संधी आहे. पाणी द्या नाहीतर एनओसीची वाट न पाहता थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.

सांगली – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायालयात प्रलंबित असतानाचा आता ४० गावांचा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला आहे व या प्रस्तावावर कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाले असून कर्नाटकला इशारे देण्यात येत आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील ४० गावांनी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम देत थेट कर्नाटकमध्ये विलीन होण्याचा इशारा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पाण्याच्या मुद्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील ४० गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. सांगलीतील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केलं. जतमधील ४० गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा, असंही बोम्मई म्हणाले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर जत तालुका पाणी कृती समितीने महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे, पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, असा अल्टिमेटम जत तालुका पाणी कृती समितीने दिला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मग महाराष्ट्र मधील सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आली आहे, इतके दिवस पाणी आणि अन्य सुविधा जत तालुक्याला का दिल्या नाहीत? असा सवाल समितीकडून उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे,पाणी द्या नाही तर आम्ही एनओसीची वाट बघणार नाही, थेट कर्नाटकात जाऊ, असा इशारा जत तालुका पाणी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी दिला आहे. याबाबत उद्या शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता उमदीमध्ये ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जत तालुका पाणी कृती समितीने दिली आहे.