मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Karnataka Border Dispute : ‘या’ कारणामुळे कर्नाटक दौरा केला रद्द, शंभूराज देसाईंनी दिलं स्पष्टीकरण

Karnataka Border Dispute : ‘या’ कारणामुळे कर्नाटक दौरा केला रद्द, शंभूराज देसाईंनी दिलं स्पष्टीकरण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2022 08:21 PM IST

Karnataka Border Dispute : महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये, म्हणून बेळगाव दौरा रद्द केल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

शंभूराज देसाईं
शंभूराज देसाईं

मुंबई–कर्नाटकने महाराष्ट्रातील बसेस व महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकांवर दगडफेक करत जोरदार नारबाजी केल्याने सीमावाद आणखी चिघळला आहे. हिरे-बागेवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त होत आहे. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

त्याचबरोबर कर्नाटक दौरा रद्द करण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. देसाई म्हणाले की, या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही कर्नाटक दौरा रद्द केल्याचा खुलासा शंभूराज देसाई यांनी केला.

देसाई म्हणाले की, कर्नाटककडून होत असलेल्या हिंसक घटनांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधत दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला आहे. त्याचबरोबर कर्नाटक पोलीस महासंचालकांशीही बोलणे झाले आहे. बागेवाडी टोल नाक्यावर दोन गाड्यांवर दगडफेक करण्यात आली असून तोडफोड करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावून केंद्राला परिस्थिती कळवली आहे, असेही शंभूराज देसाई म्हणाले.

दरम्यान आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई आज बेळगावला जाणार होते. मात्र सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची सूचना कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या सूचनेनुसार चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौरा रद्द केला.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या