मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पेटला..! कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस अडवल्या, सीमाभागात तणाव

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पेटला..! कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस अडवल्या, सीमाभागात तणाव

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 26, 2022 04:02 PM IST

Maharashtra-Karnataka Border Row : जतमधील ४० गावांचा मुद्दा पेटला असून कर्नाटक व महाराष्ट्राच्या बसेसना सीमाभागात काळे फासले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील बस वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस अडवल्या,
कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस अडवल्या,

सोलापूर/सांगली – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ४० गावे कर्नाटकमध्ये विलीन होणार असल्याचे व या गावांच्या प्रस्तावावर कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवरून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनी कर्नाटक सरकार व मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली. संबंधित ४० गावांनीही महाराष्ट्र सरकारला अल्टीमेटम देत पाणी न दिल्यास एनओसीची वाट न पाहता कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला आहे. यानंतर पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही आमचाच भाग असल्याचे म्हटल्याने सीमावाद पुन्हा उफाळला आहे. यामुळे सीमाभागातील बससेवा बंद करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या विधानाने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यातील वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यात बसला काळे फासण्याच्या घटना घडल्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमांवर बस सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. गुरुवारी कर्नाटकच्या बसवर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोला सोलापूर, कोल्हापूर, मिरज व सांगली भागात काळे फासण्यात आले होते. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेसगुलबर्गाजवळ अडवल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. यानंतर महाराष्ट्राकडूनही कर्नाटकच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान दोन्ही राज्यातील ताणवाचे वातावरण निवळेपर्यंत बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे सोलापूर-गुलबर्गा, कोल्हापूर-बेगगाव व मिरज-कागवाड-विजापूर बससेवेवर परिणाम झाला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत तालुक्यातील ४० गावांबरोबरच सोलापूर व अक्कलकोटची मागणी केल्यामुळे दोन्ही राज्यातील तणाव वाढला आहे. कर्नाटकच्या बसला दौंडमध्ये शाई फासण्यात आल्यानंतर कलबुर्गीमध्ये महाराष्ट्राच्या बसला काळे फासण्यात आले आहे. या वाढत्या तणावामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील परिस्थिती पाहून बससेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या