मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2022 11:32 PM IST

Maharashtra Karnataka Border dispute : कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत शरद पवारांनी अल्टिमेटम दिला होता की, जर येत्या ४८ तासांत हिंसाचार न थांबल्यास माझ्यासह सर्वांना बेळगावात जाऊन तेथील लोकांना धीर द्यावा लागेल. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पवार-फडणवीस
पवार-फडणवीस

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. आज बेळगावजवळ हिरे-बागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत हल्ला चढवला. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले व पुण्यात कर्नाटकच्या वाहनांची हवा सोडण्यात आली. कर्नाटकच्या या आगळीकीने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन ४८ तासात जर हिंसाचार थांबला नाही तर मला सीमाभागातील लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांच्या अल्टीमेटमवर पत्रकारांनी विचारल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीमाभागात राहणारे लोक नेहमीच आपल्या सर्वांच्या संपर्कात असतात. त्यांची अपेक्षा असते की, परिस्थितीत गंभीर झाल्यावर महाराष्ट्राने त्यांना धीर द्यावा, पाठिंबा द्यावा. आपला नेहमीच पाठिंबा त्यांना असतो. मला असं वाटतं की ४८ तासांत शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नाही. निश्चितपणे कर्नाटक सरकार,केंद्रसरकार आणि राज्य सरकार ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रातील लोकांनाही माझी विनंती आहे,की अॅक्शनला रिअॅक्शन दिली तर या गोष्टी वाढत जातील. या कोणाच्या हिताच्या नाहीत.

शरद पवारांनी आरोप केला आहे की, सीमाप्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही,अन्य पक्षांशी चर्चा करत नाही,थेट निर्णय घेते आणि अंमलबजावणीही होत नाही. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमुळेच झाली. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना चर्चेला बोलावलं. शरद पवारांनाही बोलावलं होतं. कदाचित प्रकृतीच्या कारणामुळे ते त्यावेळी येऊ शकले नसतील.

शरद पवार म्हणाले होते की, येत्या ४८ तासांत कर्नाटकने हिंसाचार थांबवला नसल्यास माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. मात्र महाराष्ट्राच्या संयमाचाही अंत होऊ शकतो.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या