Badlapur News : चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर बदलापूर पेटलं, चौकशीसाठी एसआयटीची स्थापना-maharashtra govt forms sit to probe sexual abuse of two school girls amid protests ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Badlapur News : चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर बदलापूर पेटलं, चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

Badlapur News : चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर बदलापूर पेटलं, चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

Aug 20, 2024 06:27 PM IST

Badlapur Rape Case: बलात्कार लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश दिले.

लात्कार लैंगिक अत्याचारप्रकरणी एसआयटीची स्थापना
लात्कार लैंगिक अत्याचारप्रकरणी एसआयटीची स्थापना

Badlapur Minor Girl Rape: बदलापूर येथील एका शाळेतील दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश राज्य सरकारने मंगळवारी दिले. एका महिला पोलीस महानिरीक्षकाच्या निरीक्षणाखाली याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

बदलापूर अत्याचारप्रकरणी चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.

बदलापूर येथील बालवाडीतील तीन व चार वर्षांच्या दोन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी शाळेतील एका शिपायाला पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी अटक केली. तक्रारीनुसार, त्याने शाळेच्या शौचालयात मुलींवर अत्याचार केला. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.या घटनेनंतर शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक आणि अनेक महिलांसह इतरांनी बदलापूर स्थानकात रुळांवर येऊन लोकल रोखून धरल्याने कर्जत ते कल्याण मार्गावरील सेवेवर परिणाम झाला. या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार- एकनाथ शिंदे

बदलापूर अत्याचारप्रकरणातील आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'बदलापूरयेथील घटनेची मी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी एसआयटी ची स्थापना करण्यात आली असून ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेवरही आम्ही कारवाई करणार आहोत. आम्ही या प्रकरणाचा जलद गतीने निपटारा करण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि दोषी आढळल्यास कोणालाही सोडले जाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी एएनआयशी बोलताना सांगितले.

शिक्षणमंत्री काय म्हणाले?

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सध्याच्या सुरक्षेच्या उपाययोजना अधिक मजबूत होतील याकडे आम्ही लक्ष देऊ. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कार्यान्वित असावेत, असे परिपत्रक आम्ही आज जारी करीत आहोत. शाळांमध्येही समिती नेमणार आहेत. आम्ही हे प्रकरण जलदगतीने चालवू आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊ. शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि दोन सहाय्यकांना निलंबित करण्यात आले आहे. शाळेला नोटीसही बजावण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यास उशीर करणाऱ्या महिला वरिष्ठ पीआयची बदली करण्यात आली आहे.

विभाग