Hearth Health : लहान मुलांच्या शाळेची वेळ सकाळी साडेदहाची असावी; हृदयविकार तज्ज्ञांना असं का वाटतं?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hearth Health : लहान मुलांच्या शाळेची वेळ सकाळी साडेदहाची असावी; हृदयविकार तज्ज्ञांना असं का वाटतं?

Hearth Health : लहान मुलांच्या शाळेची वेळ सकाळी साडेदहाची असावी; हृदयविकार तज्ज्ञांना असं का वाटतं?

Oct 07, 2023 12:36 PM IST

Dr. Manjunath in World Congress on Cardiac Imaging : 'कार्डियाक इमेजिंग व क्लिनिकल कार्डिओलॉजी' या विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मंजुनाथ यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.

World Congress on Cardiac Imaging
World Congress on Cardiac Imaging

Dr. Manjunath in World Congress on Cardiac Imaging : 'लहान मुलांची झोप नीट व्हावी व मुलांची तयारी करताना पालकांचा देखील ताणतणाव कमी व्हावा, यासाठी मुलांच्या सकाळी शाळा साडेदहा वाजल्यापासून सुरू करायला हव्यात. तसं केल्यास जास्त चांगलं होईल, असा सल्ला कार्डियाक इमेजिंग वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सी आर मंजुनाथ यांनी दिला आहे.

'कार्डियाक इमेजिंग व क्लिनिकल कार्डिओलॉजी' या विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेचं उद्घाटन राज्यपाल रमेश बैस (Ramesh bais) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये झालं. त्यावेळी मंजुनाथ बोलत होते.

हृदयविकाराच्या विविध कारणांकडं त्यांनी यावेळी उपस्थितांचं लक्ष वेधलं. 'पूर्वी शहरातील व विशेषत: सुखसंपन्न लोकांना होणारे हृदयविकाराच्या समस्या उद्भवत असत. मात्र, आता गरीब, कामगार व गावकरी देखील या विकारानं त्रस्त आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. अपुरी झोप आणि ताणतणावाचाही परिणाम होत आहे. यावर उपाय सांगताना त्यांनी लहान मुलांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याची गरज व्यक्त केली.

'जीवनशैली आजारांच्या बाबतीत भारतात गंभीर परिस्थिती असून हृदयविकार रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग व अलीकडच्या काळात स्क्रीन अ‍ॅडिक्शन वाढत आहे. हृदयरोगांमुळं होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू चाळीशीच्या आतील व्यक्तींचे होत आहेत. वाढत्या हृदयविकारांमागे हवेतील प्रदूषण हे देखील एक कारण असल्याचं समोर आलं आहे, असं मंजुनाथ यांनी यावेळी सांगितलं.

राज्यपालांचं हृदयरोग तज्ज्ञांना आवाहन

राज्यपाल बैस यांच्या हस्ते यावेळी 'कार्डियाक इमेजिंग अपडेट - २०२३' या पुस्तकाचं तसेच परिषदेच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. कार्डियाक इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं हृदयरोग निदान व उपचारामध्ये क्रांतिकारी बदल झाले असून लाखो लोकांना जीवनदान मिळत आहे. रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारत आहे. मात्र २० - ३० वयाच्या युवकांमध्ये दिसून येणारे हृदयविकार ही चिंतेची बाब आहे. विशी आणि तिशीतले तरुण जिममध्ये व्यायाम करताना किंवा कामाच्या ठिकाणी अचानक कोसळल्याच्या बातम्या येत असतात. त्यावेळी मनाला वेदना होतात. हे थांबविण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनी समाजाला मार्गदर्शन करावं, अशी अपेक्षा बैस यांनी यावेळी व्यक्त केली.

'ग्रामीण भागातील रुग्णांना देखील आधुनिक चिकित्सेचा लाभ होईल या दृष्टीनं टेली मेडिसिन व टेली रेडिओलॉजीचा कसा वापर करता येईल, याबाबत विचार विनिमय करावा, अशी सूचना राज्यपालांनी केली.

इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धती सामान्य रुग्णांकरिता खर्चिक असतात. अशा चाचण्यांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बहुतेक वेळा विदेशात तयार होतात व ती महागडी असतात. त्यामुळं आधुनिक वैद्यकीय उपकरणं देशात तयार झाली तर इमेजिंग चाचण्यांचा खर्च कमी होईल, असं राज्यपालांनी सांगितलं. हृदयरोग व त्यासाठी लागणारा रोगनिदान खर्च आयुष्मान भारतसारख्या योजनेतून मिळाला तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा फायदा होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

उदघाटन सत्राला अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला, वर्ल्ड फेडरेशन ऑफ कार्डियाक इमेजिंग अँड क्लिनिकल कार्डिओलॉजीचे अध्यक्ष डॉ. जी एन महापात्रा, इंदूरच्या श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक डॉ. विनोद भंडारी आदी उपस्थित होते.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर