मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Governor Apologized: राज्यपाल कोश्यारींनी मागितली महाराष्ट्राची माफी

Governor Apologized: राज्यपाल कोश्यारींनी मागितली महाराष्ट्राची माफी

HT Marathi Desk HT Marathi
Aug 01, 2022 07:46 PM IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली माफी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली माफी

मुंबई आणि ठाणे शहरातून गुजराती आणि राजस्थानी नागरिकांना बाहेर काढले तर या शहरांत पैसेच उरणार नाही. मुंबई शहराचा आर्थिक राजधानीचा दर्जाही राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टिका झाल्यानंतर कोश्यारी यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली. २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली, असं मान्य करत महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या मला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असं निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जारी केले आहे.

राज्यपाल कोश्यारी म्हणतात, 'महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.

महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.

'त्या' वक्तव्यावरून राज्यपालांवर झाली होती संपूर्ण महाराष्ट्रात टिका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याचा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांनी निषेध केला होता.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या