Old Pension Scheme : स्वतंत्र ‘पेन्शन योजना’ तयार करून २००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करावी-maharashtra government to implement pension yojana to all government employees after 2005 satyajeet tambe ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Old Pension Scheme : स्वतंत्र ‘पेन्शन योजना’ तयार करून २००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करावी

Old Pension Scheme : स्वतंत्र ‘पेन्शन योजना’ तयार करून २००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करावी

Feb 21, 2024 08:08 PM IST

Old Pension Yojana : जुन्या पेन्शन योजनेतील तरतुदींसह नव्या पेन्शन योजनेतील चांगल्या गोष्टी घेत महाराष्ट्राने शाश्वत आणि सामाजिक सुरक्षा देणारी स्वतंत्र पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी सरकारकडे केली आहे.

Old Pension Yojana
Old Pension Yojana

देशाला दिशादर्शक पेन्शन योजना महाराष्ट्र सरकारने तयार करावी. जुन्या पेन्शन योजनेतील लाभ जसेच्या तसे घेऊन नव्या पेन्शन योजने मधल्या चांगल्या गोष्टी सोबत जोडून महाराष्ट्र शासनाने स्वतःची अशी स्वतंत्र पेन्शन योजना तयार करावी, तसेच ती राज्यातील २००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करावी. याची येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

राज्यासह देशभरात जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा गाजत असताना महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी शाश्वत आणि सर्वसमावेशक असा ‘नवा’ उपाय सुचवला आहे. जुन्या पेन्शन योजनेतील तरतुदींसह नव्या पेन्शन योजनेतील चांगल्या गोष्टी घेत महाराष्ट्राने शाश्वत आणि सामाजिक सुरक्षा देणारी स्वतंत्र पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी जुन्या पेन्शन योजनेबाबत पहिल्यापासून आग्रही असलेल्या आ. तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केली. 

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वेळोवेळी विधिमंडळात तसेच कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात आश्वासित करण्यात आले. तरी सुध्दा ठोस असा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. त्यावेळी ही आ. सत्यजीत तांबे यांनी आंदोलनस्थळी जात आपला पाठिंबा दर्शविला होता.

आता आ. तांबे यांनी फक्त मागणी न करता जुन्या पेन्शन योजनेचे लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना कसे मिळतील, यावरचा उपायही सरकारला सुचवला आहे. त्यासाठी त्यांनी शेजारील आंध्र प्रदेशमधील गॅरेंटिड पेन्शन योजनेचा आधार घेतला आहे. या योजनेत आंध्र प्रदेश सरकारने जुन्या व चालू अशा दोन्ही पेन्शन योजनांचं हायब्रिड मॉडेल स्वीकारलं आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्याची शाश्वती मिळाली आहे. तर महाराष्ट्रातल्या चालू पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ शेअर मार्केटची निगडित असल्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य सरकार समोर वित्तीय तूट वाढण्याचे संकट असल्यामुळे राज्य सरकारने आंध्रप्रदेश सरकारने काढलेल्या मध्यम मार्गाचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाची स्वतंत्र गॅरंटीड पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Whats_app_banner