मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नोकरीची सुवर्णसंधी! राज्य सरकार भरणार १ लाख रिक्त पदे

नोकरीची सुवर्णसंधी! राज्य सरकार भरणार १ लाख रिक्त पदे

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 21, 2022 01:48 PM IST

नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो तरुणांसाठी खूषखबर आहे. लवकरच राज्य सरकार एक लाख रिक्त पदे भरणार आहे.

मंत्रालय
मंत्रालय

नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील होतकरू तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारनं नोकरभरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर आता रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य सरकारच्या सर्व विभागांनी त्यांच्याकडील मंजूर व रिक्तपदांच्या आकृतीबंधास मान्यता घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. (Maharashtra Government Jobs Recruitment)

सध्या राज्य सरकारच्या ३४ प्रमुख विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद आधीच अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळं येत्या काळात राज्यात किमान लाखभर पदे भरली जाणार आहेत.

कोविड संकटात गेलेली दोन वर्षे आणि त्याआधी चार वर्षे अशी एकूण सहा वर्षे राज्य सरकारच्या विभागांमध्ये पदभरती झालेली नाही. त्यामुळं रिक्त पदांची संख्या वाढली आहे. गृह विभागात सुमारे १८ हजार, जलसंपदा विभागात १५ हजार, पशुसंवर्धन, कृषी, मराठी राजभाषा विभाग, महसूल, भूमीअभिलेख, पुरवठा विभाग, शिक्षण अशा विभागांतही हजारो पदे रिक्त आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ६० हजार पदांची भरती करण्याची घोषणा झाली होती. मात्र, त्यावर पुढं कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर नव्या सरकारनं पदभरतीवरील निर्बंध उठवल्यामुळं बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सध्याच्या रिक्त पदांपैकी ५० टक्के जागांवर भरती होईल, असं सांगितलं जात आहे. आकृतीबंधास अंतिम मान्यता मिळताच ही भरती प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित आहे. राज्यात सध्या ११,५३,०४२ इतकी मंजूर पदे असून त्यापैकी ८,७४,०४० पदे भरली गेली आहेत. तर, रिक्त पदांची संख्या २,०६,३०३ आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एकूण १.३१ लाख कोटी रुपये खर्च केले जातात. ग्रॅच्युइटी व पेन्शनवर दरवर्षी जवळपास ५६ हजार कोटींचा खर्च होतो.

IPL_Entry_Point