दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा कर्जत येथील एन.डी.स्टुडिओ आता परिचालनासाठी राज्य सरकारने ताब्यात घेतला आहे. हा स्टुडिओ आता गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात देण्यात आला आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने स्टुडिओचा ताबा घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. आता एन.डी. स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
कर्जत येथील एनडी स्टुडिओची पाहणी करण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उप सचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता (स्थापत्य) विजय बापट, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे आदि अधिकारी गेले होते.
राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने (NCLT) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या ठराव प्रस्ताव (Resolution Plan) ला १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन. डी. स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत. या कामकाजाची पाहणी करण्यासाठी खारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एन. डी. स्टुडिओची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
प्रशासकीय आणि विकासात्मक कार्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये सह व्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उप समन्वयक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखावित्तधिकारी, व्यवस्थापक कलागारे, उप अभियंता ( स्थापत्य ), उप अभियंता (विद्युत) आदि अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. याचबरोबर वित्तीय, विधी, आयटी, मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचा देखील समावेश करण्यात आला आहे.