मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सरकारचा मोठा निर्णय.. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही!

सरकारचा मोठा निर्णय.. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 25, 2024 09:11 PM IST

Government Scheme : सरकारी योजनांचा लाभ आता घरबसल्या मिळणार आहे. सरकार येत्या ६ महिन्यात सर्व सेवा ऑनलाईन करणार आहे.

Government Scheme
Government Scheme

राज्य व केंद्र शासन सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे. राज्य शासन येत्या ६ महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाइन करणार असल्याने एकाही सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

महसूल मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा सुरू केल्याने या योजनेचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. महसूल विभागाने सुरू केलेल्या सलोखा योजनेच्या माध्यमातून शेती विषयक अनेक समस्या सोडवल्या जात आहेत. शेत रस्ते, पाणंद रस्ते निर्माण केले जात आहेत. पशुसंवर्धन विभागाने गोसेवा कायदा आणल्याने देशी गाईंच्या संवर्धनाला प्रोत्साहन मिळत आहे. तसेच लंपी आजार आल्यानंतर राज्यातील सर्व गोवंशीय जनावरांचे लसीकरण मोफत करण्यात आले. देशात मोफत लसीकरण फक्त आपल्या राज्यातच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढील काळात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात मोजणीची प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे त्वरित निकाली निघणार आहेत. अद्यावत तंत्रज्ञाने मोजणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला २५ ते ३० रोव्हर उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात रोव्हर कमी पडत आहेत त्या जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून रोव्हर खरेदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिली.

WhatsApp channel