पुढच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता २ री पर्यंचे वर्ग सकाळी ९ नंतरच सुरू करण्याविषयी महाराष्ट्र सरकार विचार करत आहे. राज्य सरकारने याबाबत एका तज्ज्ञ समिती नियुक्त केली असून केली असून समितीच्या अहवालानंतर पुढच्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण अवलंबले जाणार आहे. असे संकेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. नव्या धोरणानंतर पहिली व दुसरीचे वर्ग सकाळी ९ नंतरच सुरू होणार आहेत.
याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, समितीच्या अहवालानंतर पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांच्या काही वर्गाची वेळ येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येईल. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केसरकर यांनी ही माहिती दिली.
नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली व दुसरीचे वर्ग सकाळी ९ नंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या सकाळी लवकर शाळा भरत असल्यानेलहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या मेंदूमधील सिक्रेशनवर पडतो. यामुळे मुलांच्या मेंदूची वाढ खुंटते. हा सकाळच्या शाळांच्या वेळेचा विषय सरकारच्या विचाराधीन होताच. त्यामुळे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेची वेळ कोणत्याही परिस्थितीत सकाळी ९ च्या आधी नसावी असे तज्ज्ञांचे मत आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनीही याबाबत भाष्य केले होते. मुलांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने सध्याची सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ ही सात ऐवजी ९ पासून सुरू करण्याचे राज्यपाल म्हणाले होते. यामुळे मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांचे शिक्षणात लक्ष लागेल तसेच त्यांची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढेल.
५ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, सध्याच्या काळात मोठ्यांबरोबरच लहान मुलांच्या झोपण्याची पद्धत बदलली आहे. मुले मध्यरात्रीनंतरही जागे राहतात. मात्र त्यांना सकाळच्यी शाळा असल्याने लवकर उठावे लागते व त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. यामुळे राज्य सरकारने शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार करावा, असे राज्यपालांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या