No Parking No Car : राज्यात वाढती वाहतुकीची समस्या व पार्किंगची अपुरी जागा या संदर्भात नवे धोरण आणण्याच्या तयारीत सरकार आहे. याअंतर्गत कार खरेदी करण्यापूर्वी कार पार्किंगच्या जागेची माहिती द्यावी लागणार आहे. जर पार्किंग ची जागा नसेल तर कार खरेदीची परवानगी नसेल. मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा एक भाग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे एका मुलाखती दरम्यान, सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधा आता अॅपच्या माध्यमातून वापरता येणार आहेत. कारमालकांकडे देखील पार्किंगची जागा असावी हा या धोरणाचा उद्देश आहे.
हे धोरण लवकरच लागू केले जाणार आहे, असे देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मात्र, खासगी इमारतींमध्ये सार्वजनिक पार्किंग किंवा पार्किंगची उपलब्धता निश्चित करण्याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. रस्त्यांवरील पार्किंग कमी करून त्यांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देऊन ही समस्या दूर करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून होणारी टीका फेटाळून लावली. मुंबई हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. अभिनेता सैफ अली खानयाच्या वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत महाराष्ट्राला १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १५ लाख संभाव्य नोकऱ्या मिळाल्या आहेत. फडणवीस म्हणाले की, जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जागतिक समुदायाचा विश्वास आणि एनडीए सरकारला मिळालेले बहुमत हे प्रमुख कारण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची ओळख 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' आणि देशाची औद्योगिक महासत्ता अशी करून दिली. महाराष्ट्रात मिळालेल्या निर्णायक बहुमतामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे, असे मला वाटते. आमच्या मागील सरकारच्या कामगिरीनंतरही गुंतवणूकदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मोठा जनादेश मिळाल्यानंतर आत्मविश्वास अधिकच वाढला असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. '
संबंधित बातम्या