महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीची सुनामी आल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला २३५ जागांचा बहुमत मिळालं असलं तरी राज्य़ाचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, याचा सस्पेन्स निकालाच्या चौथ्या दिवशीही कायम आहे. त्याच आता भाजप सोडून सर्वच पक्षांना पक्षफुटीचा धोका सतावत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतित्रज्ञापत्र लिहून घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून रस्सीखेच सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांकडून लिहून घेतलेल्या प्रतिज्ञापत्राला खूप महत्त्व आले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप १३२ आमदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याचबरोबर त्यांचे सहयोगी पक्ष व अपक्षांचे संख्याबळ मिळून आमदारांची संख्या १४० झाली आहे. त्यामुळे भाजपला स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठटी केवळ ५ ते ६ आमदारांची गरज असून अजित पवारांनीही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन दिले आहे. यामुळे भाजपकडे १८१ आमदारांचे संख्याबळ आहे. दरम्य़ान एकनाथ शिंदे सावधगिरी बाळगताना दिसत असून त्यांनी अन्य अपक्षांना गळाला लावण्यास सुरूवात केली आहे.
भाजपला निवडणुकीत खूप मोठे यश मिळाल्यानंतर त्य़ांचा मुख्य़मंत्रीपदावरचा दावा मजबूत झाला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे जपून पावले टाकताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदे यांनीह आपल्या आमदारांकडून पक्ष सोडून जाणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षनेत्याचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत. पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल असा आशय या प्रतिज्ञा पत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना ज्या गोष्टी घडल्या,त्या पुन्हा आपल्यासोबत घडू नयेत यासाठी शिंदे खबरदारी घेत असल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी सोमवारी सर्व २० आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आमदारांना पक्षबदल करणार नसल्याचे लेखी स्वरुपात देण्यास सांगण्यात आले. या सर्व आमदारांकडून शपथपत्रे घेण्यात आली असून,त्यात पक्षाशी एकनिष्ठ राहू आणि जो नेता निवडला जाईल त्याला ते स्वीकारतील,असे लिहिले आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना अधिकार देण्यात आले आहेत.