पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्याची दोन टोके गाठणारे आणखी नवे दोन मार्ग शहराला मिळणार आहेत. या नव्या दोन मार्गामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सुखकारक होणार आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत दोन्ही मार्गांना मंजुरी मिळाली आहे. पुण्यातील दोन मार्गांना अल्पावधीत मिळालेला पुणेकरांचा प्रतिसाद पाहता राज्य सरकारने सोमवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना मंजुरी दिली
स्वारगेटहून हडपसर-खराडी व स्वारगेटहून खडकवासला तसेच नळ स्टॉपवरून माणिकबाग असे दोन विस्तारित मार्ग आता केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवले आहेत. महामेट्रोने या दोन्ही मार्गांचे प्रकल्प अहवाल तयार केले असून राज्यस्तरावर ते आता मंजूर झाले असून केंद्राच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे.
राज्य सरकारने या दोन मेट्रो प्रकल्पांसाठी ९ हजार ८९७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या मेट्रो मर्गाची लांबी ३१.६३किमी असणार आहे. तर यामध्ये २८ स्थानकांची उभारणी होणार आहे.
स्वारगेट ते कात्रज या ६ किलोमीटरच्या भुयारी मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने पुणे शहरासाठी मेट्रोच्या विस्तारीत मार्गाला मंजुरी दिली आहे. या मेट्रोमार्गांमुळे पुणे शहराच्या अवकाशात आता मेट्रो मार्गाचे जाळेच तयार होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील प्रवासाच्या वेळेच्या तुलनेत अतिशय कमी वेळात शहराची दोन टोके गाठणे शक्य होणार आहे. हे दोन्ही मार्ग उन्नत म्हणजे रस्त्यापासून किमान २२ ते २८ मीटर उंचीवर असतील.
सोमवारी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली. या कॅबिनेट बैठकीत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन मार्गांना मंजुरी मिळाली आहे. या दोन मार्गांमुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे चौफेर वाढणार आहे.
आज मंजुरी मिळालेल्या दोन मार्गापैकी खडकवासल्याहून खराडीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गावर दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट अशी स्थानके असणार आहेत. तसेच हा मार्ग पुढे हडपसर मार्गे खराडीला जाणार आहे. दुसरी मेट्रो नळस्टॉपपासून पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलत नगर (सनसिटी) या मार्गे माणिकबागेला जाणार आहे.