Naxalites killed in encounter : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी विरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २ महिलांसह ३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सोमवारी सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे. नक्षलवादविरोधी मोहिमेला हे मोठे यश मानले जात आहे.
गडचिरोलीचे (Gadchiroli Encounter) पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी म्हटले की, आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की, नक्षलवाद्यांच्या पेरीमिली दलमचे काही सदस्य आपल्या टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पन (TCOC) साठी एकत्र येत आहेत. हे सदस्य भामरागड तालुक्यातील कटरांगट्टा गावातील जंगलात जमले होते.
पोलिसांनी सांगितले की, गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने सी-६० कमांडोच्या २ यूनिट्सला तत्काळ शोध मोहिमेसाठी पाठवले गेले. अधिकाऱ्याने सांगितले की, या मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. याला सी-६० कर्मचाऱ्यांनी जोरदार उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळावरून १ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचा मृतदेह आढळून आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यातील एकाचे नाव वासु असे आहे. तो पेरीमिली दलमचा प्रभारी आणि स्वंयघोषित कमांडर होता.
घटनास्थळावरून AK-४७ रायफल आणि कार्बाइन जप्त -
अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून एक एके-४७ रायफल, एक कार्बाइन, एक इन्सास रायफल आणि अन्य नक्षली साहित्य मिळाले आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. नक्षलवादी सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करण्यासाठी मार्च-जून पर्यंत टीसीओसी चालवतात. कारण जंगलातील हिरवळ कमी झाल्यानंतर दृश्यमानता वाढते. यापूर्वी १९ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील रेपनपल्लीजवळ नक्षलवादी- सुरक्षा दलात चकमक झाली होती. यावेळी ३६ लाख रुपयांचे सामूहिक इनाम असलेल्या ४ संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. आता सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा नक्षलवाद विरोधी अभियान तेज केले आहे.
बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर परिसरात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या शुक्रवारी (१० मे) चकमकीत १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. ही चकमक गंगालूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पिडिया गावाजवळ एका जंगलात झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक टीम नक्षलविरोधी अभियानासाठी गेली असताना ही चकमक झाली.
गेल्या महिन्यातही सुरक्षा दलाने छत्तीसगमध्ये नक्षलवाद्यांविरोधात दोन मोहीमा राबवून अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. कांकेरमध्ये २९ नक्षलवादी ठार केल्यानंतर नारायणपूरमध्ये १० नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते. यावर्षी पहिल्या चार महिन्यात सुरक्षा दलाकडून आतापर्यंत एकून ९९ नक्षलवादी मारले गेले आहेत. जे २०२२ व २०२३ मध्ये मारले गेलेल्या २२ व ३० नक्षलवाद्यांच्या एकूण संख्येच्या अधिक आहे.