Latur Fire News: लातूर येथील ६० फूट रोडवरील सात दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आल्याची माहिती आहे. परंतु, या आगीत अनेक दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६० फूट रोडवर रोडवरील पश्चिमेकडील दुकानांना शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीची माहिती मिळताच लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सात दुकाने जळून खाक झाली.
आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीत कुशनचे दुकान, गिफ्ट सेंटर, बुक स्टॉल, पानटपरी, किराणा दुकान, स्टेशनरी दुकान, फर्निचरचे दुकान काही क्षणात जळून खाक झाले.
लातूर शहर मनपाचे अग्निशमन अधिकारी सुभाष कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८.४५ च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने महात्मा गांधी चौकातील एक आणि एमआयडीसीतील चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे १६ जवान प्रयत्न करत होते. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.