मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM Kisan : शेतकऱ्यांना दुहेरी लाभ! 'पीएम किसान'बरोबरच राज्यातील नमो सन्मान योजनेचा हप्ताही उद्याच मिळणार

PM Kisan : शेतकऱ्यांना दुहेरी लाभ! 'पीएम किसान'बरोबरच राज्यातील नमो सन्मान योजनेचा हप्ताही उद्याच मिळणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 27, 2024 05:33 PM IST

PM Kisan and Namo shetkari mahasanman : पीएम किसान योजनेचा १६वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत.

Namo Shetkari mahasanman nidhi yojana
Namo Shetkari mahasanman nidhi yojana

Namo Shetkari Mahasanman Nidhi : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी उद्याचा, २८ फेब्रुवारीचा दिवस मोठ्या आर्थिक लाभाचा असणार आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याबरोबरच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हप्तेही उद्याच पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी ६ हजार रुपये येणार आहेत. 

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनं राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत केंद्रीय योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. दर चार महिन्यांनी प्रत्येकी २ हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेचा दुसरा हप्ता रखडला होता. आता दुसऱ्या हप्त्यासह तिसरा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १६वा हप्ता देखील उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथील कार्यक्रमात १६ व्या हप्त्याच्या वितरणाचा शुभारंभ होणार आहे. पीएम किसान योजनेचे २ हजार आणि नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे मिळून ४ हजार असे एकूण ६ हजार रुपये राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांंना मिळणार आहेत. केंद्र सरकारनं २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

२०१९ पासून शेतकऱ्यांसाठी खास योजना

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारनं मागील लोकसभा निवडणुकीच्या आधी फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे एकूण ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत राज्यातील ११३.६० लाख शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७,६३८ कोटीचा लाभ झालेला आहे.

राज्यात कृषि विभागामार्फत गाव पातळीवर विशेष मोहिमेद्वारे राज्यातील सुमारे १८ लाख लाभार्थींनी पीएम किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहे.

WhatsApp channel

विभाग