mobile ban at polling stations in mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान सुरू आहे. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळं मतदानात अडथळे येत आहेत. मोबाईल बंदीमुळं देखील काही ठिकाणी गोंधळ सुरू आहे. मतदार व निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी सुरू आहे.
मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये जाताना मोबाइल नेण्यास बंदी आहे. मात्र मोबाईल सोबत नसतो असं हल्ली होत नाही. त्यामुळं मतदानासाठी केंद्रात जाताना एकतर मोबाइल स्वीच ऑफ करायला सांगितला जात आहे किंवा बाहेर ठेवण्यास सांगितला जात आहे. नागरिकांना याबाबत आक्षेप असण्याचं कारण नाही. मात्र, मोबाइल नेमका ठेवायचा कुठं याची सोय अनेक ठिकाणी नसल्यामुळं गोंधळ उडत आहे.
चांदिवलीतील एका मतदान केंद्रावर असाच प्रकार घडला. मतदानासाठी गेलेल्या एका नागरिकाला मोबाईल बाहेर ठेवण्यास सांगण्यात आलं. त्यानं प्रवेशद्वारावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मोबाइल कुठं ठेवू अशी विचारणा केली तर तुम्ही कुणाकडंही ठेवा, पण आत नेऊ नका, असं त्याला सांगण्यात आलं. त्यामुळं तो संतापला. त्यानं तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याकडं विचारणा केली तर त्यानं तुम्ही मोबाईल आणलाच कशाला, अशी विचारणा केली. यातून बाचाबाची झाली. शेवटी संबंधित नागरिकानं दुसऱ्या एका व्यक्तीकडं मोबाइल ठेवून घाईघाईनं मतदान केलं.
मतदान केंद्रावर मोबाईल बंदीला कोणाचाही आक्षेप नाही, मात्र मतदान होईपर्यंत मोबाईल बाहेर ठेवण्याची व्यवस्था करायला हवी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. 'मतदान करायला अवघी चार ते पाच मिनिटं लागतात, तेवढा वेळ सुरक्षारक्षक मोबाईल ठेवू शकत नाहीत का, असाही प्रश्न केला जात आहे.
सर्व मतदार हे मतदान केंद्राच्या शेजारीच राहणारे असतात असं नाही. ते अनेक कारणांमुळं शहराच्या इतर भागांत किंवा दुसऱ्या जिल्ह्यांत स्थलांतरीत झालेले असतात. केवळ मतदानासाठी म्हणून ते वेळ काढून आणि खर्च करू दूरवर आलेले असतात. अशा मतदारांना तुम्ही मोबाईल घेऊन आलाच कशाला, असं म्हणणं कितपत योग्य आहे. या अशा गोंधळामुळं मतदारांकडून मतदान टाळलं जाण्याचीही भीती व्यक्त होत आहे.