Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. दरम्यान, नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता मोबाईलवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी एकदा मतदान झाले आहे. उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची शनिवारी एकाच वेळी मतमोजणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात ९.७ कोटी पात्र मतदार असून विधानसभेच्या २८८ जागांसाठी ४ हजार १४० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राज्यात ५२ हजार ७८९ ठिकाणी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ३८८ 'पिंक बूथ' महिला सांभाळत आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वी सांगितले होते की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ९.६३ कोटी मतदार मतदान करतील. त्यापैकी ४.९७ कोटी पुरुष मतदार आहेत. तर, ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. याशिवाय, १.८५ कोटी तरुण मतदारांचे वय २० ते २९ वर्षे दरम्यान आहे. त्याचवेळी, २०.९३ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. १२.४३ लाख मतदार ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. यासोबतच ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या ६ हजार ३१ आहे.