Maharashtra Vidhan sabha election 2024 : राज्यात गेल्या महिन्यापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारासाठी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाइक रॅली, घरोघरी भेटी आदींमुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. आज संध्याकाळी प्रचाराची सांगता होणार असून छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. उमेदवारांसह मतदारांना देखील मतदानाच्या दिवसांची प्रतीक्षा लागली आहे. २० तारखेला एकाच टप्यात राज्यात मतदान पार पडणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज सोमवारी संध्याकाळी सहा वाहोणार आहे. महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी सर्व शक्ति पणाला लावली आहे. आज अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचार सांगता सभा देखील होणार आहे. या सभांमुळे देखील निवणुकीच वातावरण बदलण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवडणूकीची घोषणा केली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात चांगलीच रंगत आली. रूसवे फुगवे आणि बंडखोरी या सर्वात पक्षांनी जागावाटप करत उमेदवार निवडले. २२ ते २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती, ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यानंतर खऱ्या अर्थाने राज्यात प्रचाराला सुरुवात झाली.
आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राज ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी सभा घेत मतदारांना साद घातली. जवळपास महिन्याभरापासून हा सर्व प्रकार सुरू होता.
आज संध्याकाळी ६ नंतर प्रचार थांबणार आहे. या नंतर कोणत्याही प्रकारची सभा, पैसे वाटप, मतदारांवर प्रभाव पाडले, जाहिराती, प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली असून कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका देखील घेण्यास बंदी करण्यात आली आहे. असे कुणी करतांना आढळल्यास त्या पक्षावर किंवा उमेदवारावर गुन्हा दाखल होऊन त्याची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे.