विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काँग्रेसकडूनही यावर प्रतिक्रिया देण्यात आली. त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीअंतर्गत लढविण्यावरून विरोधी महाविकास आघाडीत मतभेद असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन सुमारे दीड तासभर चर्चा केली.
विरोधी आघाडी महाविकास आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पवार यांनी महाविकास आघाडीतील मतभेद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या आघाडीतील तीन घटक पक्षांची बैठक बोलवणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेने एकट्याने लढवण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेली 'इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रासाठी स्थापन झालेल्या महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय निवडणुका लढवल्या जातील स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणुका लढवल्या जाणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले होते.
स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर एकत्र निवडणूक लढविण्याबाबत आम्ही कधीही चर्चा किंवा सूचना केलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राजकीय मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढवतात, मात्र शिवसेनेच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या व्यवहार्यतेबाबत अटकळ बांधली जात आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (सपा) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे.
शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीवेळी शिवसेना खासदार संजय राऊत व आमदार आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात व आमामी स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
तसेच, येत्या शनिवारी (२५ जानेवारी) रोजी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या जन आक्रोश मोर्चा संदर्भात महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार?याबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या